दोन दिवस राज्यात गरम व दमट वारे   

विदर्भात उष्णतेची लाट कायम

पुणे : अरबी समुद्रावरून राज्यात येत असलेले प्रतिचक्रीय वारे गरम व दमटपणा घेवून येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून पुण्यासह संपूर्ण राज्यात उबदार वातावरण आहे. आणखी दोन दिवस हे वातावरण कायम असणार आहे. विदर्भातील काही भागात येत्या ४८ तासात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने शनिवारी दिला आहे.

उत्तर तामिळनाडूपासून नैऋत्य मध्य प्रदेशापर्यंत असलेली द्रोणीका रेषा आत छत्तीसगडपर्यंत कर्नाटक ते विदर्भातून जात आहे. तसेच अरबी समुद्रावरील प्रतिचक्रीय वारे गरम व दमट आर्द्रतायुक्त वारे घेवून येत आहेत. हे वारे गुजरात, कोकण व लगतच्या मध्य महाराष्ट्रात उबदार व दमट हवा घेवून येत आहेत. राज्यात पुढील दोन दिवस आकाश वेळोवेळी ढगाळ होणार आहे. उबदार वातावरण कायम असणार आहे.  

कोकण, गोव्यात पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे असणार आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज (रविवारी) मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर व वर्धा जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात दोन दिवस उबदार वातावरण असणार आहे. येत्या ४८ तासात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे. मागील २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. राज्यातील बहुतांश भागात कमाल आणि किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. अकोला येथे उच्चांकी ४२.६ अंश कमाल, तर महाबळेश्वर येथे नीचांकी २०.९ अंश किमान तपमानाची नोंद झाली.

पुण्यात नोंदलेले तपमान
ठिकाण कमाल किमान
कोरेगावपार्क ४१ अंश २६.५ अंश
लोहगाव ४० अंश २४.६ अंश
शिवाजीनगर ३९ अंश २२.५ अंश
एनडीए ३९ अंश २२ अंश
मगरपट्टा ३९ अंश २७.१ अंश
पाषाण ३८ अंश २३.१ अंश

 

Related Articles