जेजुरीतील नागरिकांना दहा दिवसांनी पाणी   

नगरपालिकेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; मुख्याधिकार्‍यांचे दुर्लक्ष

जेजुरी, (वार्ताहर) : नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे जेजुरी शहरातील नागरिकांना दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. जेजुरी नगरपालिकेकडून पाण्याचे नियोजन व्यवस्थित केले जात नसल्यामुळे संपूर्ण जेजुरीकरांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणी वेळेवर येत नसल्याने येथील महिला संतप्त झाल्या आहेत. जर दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढून नगरपालिकेचा निषेध केला जाईल, असा इशारा येथील महिलांनी दिला आहे. पाण्यासंदर्भात मुकादम व कर्मचारी यांना फोन केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे व चुकीची माहिती दिली जाते. पाईप लाईन फुटली आहे, लाईट गेली आहे, टाक्या भरल्या नाहीत, अशी खोटी माहिती दिली जात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. एकंदरीत नगरपालिका प्रशासनाकडून या खोट्या माहितीच्या आधारे नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. मुख्याधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करून समान दाबाने नागरिकांना पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे, तसे न झाल्यास येत्या दोन दिवसांत महिलांचा नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

 

Related Articles