नाशिकमध्ये ऐतिहासिक रहाड रंगोत्सव साजरा   

नाशिक : नाशिकमध्ये शनिवारी रहाड रंगोत्सव उत्साहात साजरा झाला. देशात अनेक ठिकाणी होळीनंतर धुळवडीच्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा असताना महाराष्ट्रात काही ठिकाणी मात्र होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी करण्याची पद्धत आहे. यामध्ये नाशिकच्या रंगपंचमीला विशेष महत्त्व असून, नाशिकमध्ये रंगपंचमीनिमित्त रहाड रंगोत्सव विशेषत: तो जुन्या नाशिकमध्येच साजरा होतो.

ऐतिहासिक काळामध्ये अटकेपार झेंडे लावणारे मराठी शासक पेशवे हे उत्सवप्रिय म्हणून देखील प्रसिद्ध होते. विविध उत्सवाबरोबर पंचमी देखील केशवराज उत्साहात साजरी होत असे. नाशिकमध्ये इतिहासातील बराच मोठा काळ पेशव्यांचे राज्य आणि पेशव्यांचे सरदार नारोशंकर राजे बहाद्दर यांनी शासन केले. नाशिकमधील रहाड रंगोत्सव हा इतिहासकालीन असून, अशा प्रकारचा बहुधा एकमेव रंगोत्सव आहे. सर्वत्र धुळवड अथवा रंगपंचमीला रंगोत्सव साजरा करताना एकमेकांच्या अंगावर रंग उडविण्याची पद्धत आहे; परंतु जुन्या नाशिकमध्ये पेशवेकालीन रहाड म्हणजेच सर्वसाधारणतः १२ फूट खोल आणि मोठे मोठे रुंद असे सहा दगडी हौद आहेत. फुलपानांपासून आणि नैसर्गिक रंगापासून विशिष्ट पद्धतीचा रंग आणि त्यामध्ये आयुर्वेदिक औषधी मिसळून रंग तयार केला जातो. या रंगाच्या हौदामध्ये डुबकी मारल्यानंतर उन्हाळ्यात होणारे त्वचा आणि इतर प्रकारचे आजार होत नाहीत अथवा नियंत्रणात राहतात, अशी नाशिककरांची धारणा असून नाशिककर नागरिक विशेषत: तरुण-तरुणी या राहडीत डुबकी मारून रंगपंचमी साजरी करतात.

अलीकडे ५०-६० वर्षाच्या काळामध्ये नाशिककरांना पाच रहाडी परिचित होत्या; परंतु रंगपंचमीच्या अवघ्या काही दिवस आधी नाशिकमध्ये स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना जुन्या नाशिकमधील परिसरात आणखी एक पेशवेकालीन बारा फूट खोल रहाड सापडली. या परिसरामध्ये राहणार्‍या नागरिकांनी सदर पेशवेकालीन रहाड जतन करण्याचा निर्णय घेतला आणि स्मार्ट सिटी प्रशासनाला  ती रहाड नष्ट न करण्याची विनंती केली. स्मार्ट सिटी प्रशासनाने देखील त्यांची विनंती मान्य करून आपल्या कामाची दिशा बदलली. रहाड साधारण ८० ते ९० वर्षांपूर्वी रंगपंचमीसाठी उपयोगात आणत. परंतु कालांतराने रहाड नाशिककरांच्या विस्मरणात गेल्याचे वयोवृद्ध सांगतात.

 

Related Articles