जेईई मेन्स परीक्षांच्या तारखेत बदल   

पुणे : देशातील आयआयटी, एनआयटी आणि अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई मेन्स) या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. ही परीक्षा आता ४ ते १२ एप्रिल या कालावधीत होणार आहे.

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) परीक्षा होणार्‍या शहरांबाबतचा तपशील जाहीर केला. परीक्षेच्या तारखांमधील बदल स्पष्ट झाला आहे. आधीच्या नियोजनानुसार दुसर्‍या सत्राची जेईई मुख्य परीक्षा ४ ते १५ एप्रिल या कालावधीत होणार होती.

नव्या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी पदवी, तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठीचा पेपर १, ४, ५, ६, ८ आणि ९ एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा, दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे. तर वास्तुकला पदवी, नियोजन पदवी अभ्यासक्रमासाठीचा पेपर दोन १२ एप्रिलला सकाळी नऊ ते दुपारी १२.३० या वेळेत होणार आहे.

ही परीक्षा परदेशातील २२ शहरांसह देशभरातील अंदाजे ३१९ शहरांतील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या तीन दिवस आधी प्रसिद्ध केले जाणार असल्याची सूचना एनटीएने नमूद केली आहे. अधिक माहिती एनटीएच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Related Articles