वेंकटेश अय्यरने ठोकला आयपीएलमधील सर्वात लांब षटकार   

बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत  दहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पाडला. या सामन्यात कोलकाताने ७ विकेट्सने विजय मिळवला. कोलकाताच्या विजयात वेंकटेश अय्यरने अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात बंगळुरूने कोलकातासमोर १८३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताकडून वेंकटेश अय्यरने ३० चेंडूत ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. दरम्यान, या चार षटकारांपैकी त्याचा एक षटकार आयपीएल २०२४ मधील आत्तापर्यंतचा सर्वात लांब षटकार ठरला. हा षटकार त्याने मयंक डागरने गोलंदाजी केलेल्या ९ व्या षटकात मारला होता.
 
डागरने टाकलेल्या या षटकातील चौथ्या चेंडूवर अय्यरने डीप मीडविकेटवरून मोठा षटकार मारला. हा षटकार १०६ मीटर लांब गेला. त्यामुळे हा षटकार आयपीएल २०२४ मधील सर्वात लांब षटकार ठरला. त्याच्याआधी हा विक्रम इशान किशनच्या नावावर होता. इशानने २७ मार्च रोजी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १०३ मीटरचा षटकार मारला होता.दरम्यान, आयपीएल २०२४ हंगामात प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करणारा कोलकाता पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी यंदाच्या हंगामात झालेल्या नऊ सामन्यात घरच्या मैदानावर खेळणार्‍या संघांनी विजय मिळवले होते. कोलकाताकडून वेंकटेश अय्यर व्यतिरिक्त सुनील नारायणने २२ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. तसेच फिल सॉल्टने २० चेंडूत ३० धावा केल्या, तर कर्णधार श्रेयस अय्यरने २४ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. त्यामुळे बेंगळुरूने दिलेल्या १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग कोलकाताने १७ व्या षटकातच पूर्ण केला. बेंगळुरुकडून यश दयाल मयंक डागर आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. तत्पुर्वी, बेंगळुरूकडून विराट कोहलीने ५९ चेंडूत ८३ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे बेंगळुरूने २० षटकात ६ बाद १८२ धावा केल्या.
 

Related Articles