विराट-गंभीरला ऑस्कर द्या : सुनील गावसकर   

बंगळुरु : इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत झालेल्या १० व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ७ बळीने विजय मिळवला. दरम्यान, एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यावेळी एक घटना सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. ती घटना म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहली यांची झालेली भेट. यावर रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
 
खरेतर यापूर्वी विराच आणि गंभीर यांच्यात आयपीएलवेळी अनेकदा वाद झाले आहेत. त्यातही गेल्यावर्षी गंभीर लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक असताना बेंगळुरूविरद्धच्या सामन्यातनंतर त्याचे विराटबरोबर कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली होती. त्याचमुळे आता गंभीर लखनऊ संघाबरोबरचा प्रवास थांबवून कोलकाता संघात आल्यानंतर कोलकाता आणि बंगळुरु संघात होणार्‍या सामन्यात त्याचे आणि विराट यांचे संबंध कसे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण अखेर या दिल्लीकरांनी समेट केली. दरम्यान, जेव्हा त्यांच्या भेटीचे दृश्य ब्रॉडकास्टटरकडून दाखवण्यात येत होते, त्यावेळी रवी शास्त्री आणि सुनील गावसकर समालोचन करत होते.
 
समालोचनावेळी शास्त्री म्हणाले, ’ही घटना फेअरप्ले पुरस्कारासाठी पात्र आहे.’ त्यानंतर गावसकर गमतीने म्हणाले, ’फक्त फेअरप्ले नाही, तर त्यांना ऑस्कर द्यायला हवा. दरम्यान, विराट आणि गंभीर यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरच व्हायरल होत आहे. सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १८२ धावा केल्या होत्या. बंगळुरूकडून विराटने ५९ चेंडूत सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले.
 
त्याच्याव्यतिरिक्त कॅमेरॉन ग्रीनने ३३ धावा, ग्लेन मॅक्सवेलने २८ धावा आणि दिनेश कार्तिकने २० धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून हर्षित राणा आणि आंद्र रसेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग कोलकाताने १६.५ षटकातच ३ विकेट्स गमावत १८६ धावा करत पूर्ण केला. कोलकाताकडून वेंकटेश अय्यरने ३० चेंडूत ५० धावांची खेळी केली, तर सुनील नारायणने २२ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने २४ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. बंगळुरूकडून यश दयाल, मयंक डागर आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
 

Related Articles