कंबोडियात ५ हजार भारतीयांना केले ‘सायबर गुलाम’   

कंबोडिया देशामध्ये तब्बल ५ हजार भारतीय अडकल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली. हजारो भारतीयांची फसवणूक करत त्यांना नोकरी आणि इतर काही गोष्टींचे आमिष दाखवून गुलाम केले आहे. या प्रकरणामध्ये अधिकारी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत लाखो रूपये उकळल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. कंबोडियामध्ये ५ हजारांहून अधिक भारतीयांना वेठीस धरले असून त्यांच्याकडून चुकीचे कामे करून घेतले जात आहे. कंबोडियामध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी आता केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
 
कंबोडिया हे एक सायबर गुलामगिरीचे केंद्र मानले जाते. कंबोडियामध्ये अडकलेल्या या लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध काम करण्यास भाग पाडले जात असून त्यांच्याकडून सायबर फसवणुकी सारखे कामे करून घेतले जाते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कंबोडियातील लोक जास्त करून भारतीयांनाच फसवल्याचा अंदाज आहे.
 

भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न

 
भारत सरकारच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर सुरक्षेसंदर्भातील अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत कंबोडियामध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच कंबोडियात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी काय रणनीती तयार करता येईल? या संदर्भात चर्चा झाली.
 

सहा महिन्यांत ५०० कोटी रुपयांची फसवणूक?

 
खासगी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या या बैठकीचा अजेंडा हा या जाळ्या संदर्भात चर्चा करणे आणि तेथे अडकलेल्या लोकांना परत आणणे हा होता. तसेच गेल्या सहा महिन्यांत कंबोडियामधून सायबर फसवणुकीतून भारतात ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
 

कशी होते फसवणूक?

 
'डेटा एन्ट्री' सारख्या नोकरीचा बहाणा देत काही एजंट लोकांमार्फत कंबोडियाला पाठवले जात असल्याचे आतापर्यंत झालेल्या काही गुन्ह्याच्या माध्यमांतून केंद्रीय यंत्रणांच्या तपासात उघड झाले आहे. त्यानंतर फसवणूक झालेल्या व्यक्तीला सायबर फसवणूक करण्यास भाग पाडले. यामध्ये बहुतांश लोक दक्षिणेकडील असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
 

आठ जणांना झाली होती अटक

 
ओडिशा पोलिसांनी गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी  सायबर क्राईमचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले होते. कंबोडियामध्ये लोकांना नेण्यासाठी सहभागी असलेल्या आठ जणांना अटक करण्यात आली होती. या कारवाई संदर्भात एका अधिकाऱ्याने माहिती देताना म्हटले होते की, केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीवर हे प्रकरण आधारित आहे. त्याची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक झाली होती. यानंतर आम्ही देशाच्या विविध भागातून आठ जणांना अटक केली. यानंतर या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या बऱ्याच जणांविरुध्द्व नोटीसा जारी केल्या होत्या.
 

आतापर्यंत तिघांना परत भारतात आणण्यात यश

 
कंबोडिया अडकलेल्यांपैकी आतापर्यंत तिघांना पुन्हा भारतात आणण्यात यश आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले होते. कर्नाटक सरकारच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कंबोडियामध्ये अडकलेल्या राज्यातील तीन लोकांना भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले. मात्र, ज्या तिघांना पुन्हा भारतात आणण्यात आले त्यांनी सांगितले होते की, तब्बल २०० लोक कंबोडियात अडकले आहेत.
 

Related Articles