‘क्लीन स्वीप’चे आव्हान!   

निवडणूक वार्तापत्र : गुजरात

 
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने गुजरातमध्ये फक्त २६ जागा असल्या तरी देशाच्या राजकारणात या राज्याला खूप महत्त्व आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य आहे. भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गांधीनगरमधून दुसर्‍यांदा तिकीट दिले आहे. राजकोट आणि पोरबंदरमधून पुरशोत्तम रुपाला आणि मनसुख मांडविया या मंत्रीमहोदयांना उमेदवारी देण्यात आली आहे. सलग दोन लोकसभा निवडणुकींमध्ये गुजरातमधील सर्व २६ जागा भाजपने जिंकल्या आहेत. ही कामगिरी कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.
 
‘इंडिया’ आघाडीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षात युती झाली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने अचानक मुसंडी मारून विधानसभेत प्रवेश केला. आता या दोन्ही पक्षांच्या युतीमध्ये काँग्रेसने भरोच आणि भावनगर या दोन जागा आम आदमी पक्षाला सोडल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते नाराज झाले आहेत. भरोच मतदारसंघात ‘आप’चे डेडियापाडाचे आमदार चैत्रा वसावा यांचा सामना सात वेळा भाजपचे खासदार राहिलेल्या मनसुख वसावा यांच्याशी होणार आहे. दुसरीकडे, आम आदमी पक्षाचे आमदार उमेश मकवाना भावनगरमधून निवडणूक लढवत आहेत. या जागेवर भाजपने एका महिला उमेदवाराला संधी दिली आहे. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’गुजरातमधून गेली. मोदी यांनी गुजरातचे तीन दौरे केले आहेत. विधानसभा निवडणुकीत केवळ १७ जागा जिंकणार्‍या काँग्रेसच्या चार आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांची संख्या आता १३ झाली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
 
दिग्गज नेते अर्जुन मोधवाडिया आणि नारन राठवा यांनी काँग्रेस सोडली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका, जिल्हा पंचायत आणि तहसील पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. एकीकडे ही स्थिती असताना गुजरातमध्ये लोकसभेची उमेदवारी मिळूनही दोन उमेदवारांनी लढण्यास नकार दिला, हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. गुजरातमध्ये मोदी फॅक्टर दिसत आहे. बेरोजगारी, महागाई आणि इतर प्रश्न जनतेसमोर ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकींमध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा जास्त मते मिळाली. आता भाजपच्या मतांची संख्या कमी करणे हे काँग्रेससमोरील कठीण आव्हान असेल. २०१९ मध्ये सर्व २६ जागांवर भाजपच्या उमेदवारांना पन्नास टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती.
 
मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये ‘इंडिया’ आघाडीमध्ये आप आणि काँग्रेसची युती झाली आहे. दोन विरोधी पक्षांमध्ये मतविभागणी टळणार असली तरी भाजपला लोकसभेच्या सर्व २६ जागा राखण्याचा आत्मविश्वास आहे. गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने २०२२ च्या विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या होत्या. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या १८२ पैकी १५६ जागा जिंकून एक विक्रम केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी प्रत्येक जागेवर पाच लाख मतांच्या फरकाने विजय मिळवण्याचा दावा केला आहे. विधानसभेतील कामगिरीनंतर लोकसभा निवडणुकीत ‘आप’ने एक जागा जिंकली तरी विरोधी पक्ष म्हणून त्याची तिथली स्थिती मजबूत होईल.
 
गुजरात चार प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. गुजरातची सौराष्ट्र आणि कच्छ, उत्तर गुजरात, दक्षिण गुजरात आणि मध्य गुजरात या चार प्रदेशांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सौराष्ट्र आणि कच्छच्या लोकसभेच्या आठही जागा दीर्घकाळ भाजपकडे आहेत. या वेळी पोरबंदर आणि राजकोटवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. आधी म्हटल्यानुसार इथून भाजपने केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही मंत्री आतापर्यंत राज्यसभेतून संसदेत पोहोचले आहेत. उत्तर गुजरातच्या सात जागांमध्ये गांधीनगरचा समावेश आहे. या सात जागांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह प्रतिनिधित्व करत असलेल्या गांधीनगर आणि राज्यातील प्रमुख शहर अहमदाबादमधील दोन जागांचा समावेश आहे. २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने या भागात चांगली कामगिरी केली होती. मध्य गुजरातमधील सहा जागांमध्ये वडोदरा आणि आदिवासी बहुल दाहोद, पंचमहाल आणि छोटा उदयपूर या जागांचा समावेश आहे. दक्षिण गुजरात या प्रदेशात सुरत, भरोच आणि नवसारी या पाच जागा आहेत. भाजपचे लक्ष भरोचवर आहे. तिथे आम आदमी पक्ष काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ने भाजपच्या मनसुख वसावा यांच्या विरोधात आमदार आणि उदयोन्मुख आदिवासी नेत्या चैत्रा वसावा यांना उमेदवारी दिली आहे. मनसुख वसावा या जागेवरून अनेकदा खासदार झाले आहेत. गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील नवसारीतून निवडणूक लढवणार आहेत.
 

Related Articles