किस्से निवडणुकीचे   

रोजगार देणारे उद्योजक पराभूत

 
१९७१ मध्ये फरिदाबाद स्वतंत्र जिल्हा बनला नव्हता आणि एक संसदीय मतदारसंघ म्हणून तो गुडगाव लोकसभेचा एक भाग होता. फाळणीच्या वेळी लाहोरहून आलेल्या हरप्रसाद नंदा यांनी फरिदाबादला आपले कामाचे ठिकाण बनवले आणि एस्कॉर्टसच्या नावाने कारखाना स्थापन करून उद्योगनगरीतील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. हरप्रसाद नंदा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. एस्कॉर्टस कारखान्यांनी ट्रॅक्टर आणि राजदूत मोटरसायकलची निर्मिती केली. तेव्हा राजदूत ही सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल होती. एस्कॉर्टसचा हा कारखाना फरिदाबादचे मुख्य युनिट होते. त्यामुळे दाट लोकवस्ती असलेल्या फरिदाबादच्या हजारो लोकांची उपजीविका प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे एस्कॉर्टसवर अवलंबून होती. यासाठी नंदा यांनी निवडणूक लढवली होती. एस्कॉर्टस फरिदाबादचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने आणि जलद गतीने होऊ शकतो, हे एचपी नंदा यांचे विचार अत्यंत स्पष्ट होते. लोकसभेत पोहोचायचे आणि याबाबत आवाज उठवायचा, या उद्देशाने त्यांनी निवडणूक लढवली होती; परंतु नंदा यांना केवळ १३ हजार ६०९ मतं मिळाली. राज कपूर या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत सहभागी झाले होते. प्रचारासाठी त्यांनी हेलिकॉप्टरची मदत घेतली होती आणि त्याद्वारे त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार साहित्य टाकले होते. प्रचारासाठी राज कपूर फरिदाबादलाही आले होते. राज कपूरची बहीण रितू हिचा विवाह एच. पी. नंदा यांचा मुलगा राजन नंदासोबत झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे तय्यब हुसेन एक लाख ९९ हजार ३३३ मते मिळवून खासदार झाले, तर अपक्ष उमेदवार के. नरेंद्र यांना एक लाख ३१ हजार ३९१ मते मिळाली.
 

एका मताने पराभव

 
२००४ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलाचे ए. आर. कृष्णमूर्ती यांचा काँग्रेसच्या आर. ध्रुवनारायण यांच्याकडून अवघ्या एका मताने पराभव झाला. संथेमरहल्ली विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडला. कृष्णमूर्ती यांना ४० हजार ७५१ तर ध्रुवनारायण यांना ४० हजार ७५२ मते पडली. ते एका मताने विजयी झाले. असेच आणखी एक उदाहरण २००८ च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले. नाथद्वारा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे सी. पी. जोशी आणि भाजपचे कल्याणसिंह चौहान एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत होते. निकाल जाहीर झाला तेव्हा चौहान यांना ६२ हजार २१६ मते मिळाली, तर जोशी यांना ६२ हजार २१५ मतांवर समाधान मानावे लागले. जोशी यांच्यासाठी हा धक्का होता. कारण ते राजस्थान काँग्रेसचे अध्यक्षच नव्हते, तर मुख्यमंत्रीही होते.
 

नशीबच फुटके

 
भारतीय निवडणुकांच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आले, जेव्हा विजय-पराजयात दहापेक्षा कमी मतांचं अंतर असतं. याचं ताजं उदाहरण २०१८ मधील मिझोराम विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले. मिझोराम नॅशनल फ्रंटच्या लालचंदमा राल्टे यांनी तुईवावल विधानसभा जागेवर काँग्रेसचे आमदार आर. एल. पिनमाविया यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव केला. निवडणुकीत राल्टे यांना पाच हजार २०७,  तर पिनमाविया यांना पाच हजार २०४ मतं मिळाली. १९८९ मध्ये आंध्र प्रदेशमधील अनकापल्ले मतदारसंघातून काँग्रेसच्या कोनाथला रामकृष्ण यांनी लोकसभेची निवडणूक फक्त नऊ मतांनी जिंकली. १९९८ मध्ये बिहारच्या राजमहल लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सोम मरांडी विजयी झाले होते. नऊ मतांनी त्यांचा विजय झाला. उत्तर प्रदेशमधील मैनपुरी लोकसभा मतदारसंघ अडीच दशकांहून अधिक काळ समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत तो चर्चेत असतो; मात्र हा मतदारसंघ एका रंजक कथेचाही साक्षीदार आहे. इथे एका उमेदवाराला शून्य मतं मिळाली. शंकरलाल १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. मतमोजणीवेळी त्यांचं स्वतःचं मतही अवैध ठरल्यानं त्यांना शून्य मतं मिळाली!
 

Related Articles