पुण्याला नवे राजकीय नेतृत्व देणारी निवडणूक   

पुणे लोकसभा मतदारसंघ : विजय चव्हाण

 
आगामी लोकसभा निवडणूक ही राजकीय पक्षांसाठी जशी महत्त्वाची आहे, तशीच पुण्याच्या विकासाला दिशा आणि नेतृत्व देणारी आहे. पुण्याच्याा राजकारणात आता जुने नेतृत्व जाऊन नवीन राजकीय पिढी उदयास येत आहे. त्यामुळे पुण्याला राजकीय नेतृत्व देणारी ही लोकसभा निवडणूक असणार आहे.
 
लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राजकीयदृष्ट्या विचार केल्यास पुण्यात आता नवीन नेतृत्व बहराला येत आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे गेल्या काही वर्षामध्ये पुण्यातील प्रमुख राजकीय पक्ष म्हणून ओळखले जातात. पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामध्ये नेते मंडळी विखुरली आहे. काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उदयास आला. यामुळे शहरातील नेतेमंडळी, कार्यकर्ते विखुरले गेले. यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला नाही. महाविकास आघाडी झाली, मात्र यानंतर राज्यात जे घडले ते राजकारणाच्या दृष्टीने अनपेक्षित होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटले अथवा फोडण्यात आले. आम्ही दोन पक्ष फोडून बदला घेतला असे वक्तव्य भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्याच्या राजकारणात हा मोठा भूकंप मानला जात असला तरी राजकारणाची पातळी घसरली असल्याचे सर्वसामान्य मतदारांचे मत होते. अशा प्रकारचे राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिले नाही. सक्त वसुली संचालनालय, पोलिस आणि लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडून गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांनी पक्ष बदलले. ज्यांनी पक्ष सोडले नाहीत अशा लोकांना तुरुंगात जावे लागले. विरोध झाला, आंदोलने झाली. खालच्या पातळीची टिका झाली. वयावर आणि कामावर आक्षेप घेतला गेला. सत्तेचा वापर झाला. अशा परिस्थितीमध्ये निवडणुका लागल्या आहेत.
 
पुण्याचे राजकारणसुध्दा बदलत गेले आहे. पुण्याचे नेतृत्व समाजवादी नेते एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, जयंतराव टिळक, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, आण्णा जोशी, शरद पवार, सुरेश कलमाडी, अजित पवार,  गिरीश बापट अशा मातब्बर नेत्यांनी केले आहे. जशी वर्षे गेली तशी राजकारणामध्ये नवीन पिढी उदयास आली. शरद पवार आणि अजित पवार हे सध्या राज्य आणि देशाच्या राजकारणात सक्रीय आहेत. गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. त्यामुळे पुणे शहराचे नेतृत्च करणार्‍या नेत्याची कमतरता सध्या तरी आहे. राज्य  आणि देशपातळीवर पुण्यातील प्रश्न सोडवणारा नेता सध्या तरी नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक ही पुण्याला नवीन राजकीय नेतृत्व देणारी ठरणार आहे.
 

चुरशीची निवडणूक

 
पुण्याची लोकसभा निवडणूक चुरशीची ठरणार आहे. माजी खासदार गिरीश बापट यांच्यानंतर पुण्याचे नेतृत्व कोणाकडे असा प्रश्न नेहमी विचारला जात आहे. सध्याचे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहळ, माजी सभागृहनेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार संजय काकडे, जगदीश मुळीक यांच्या नावाची चर्चा यानिमित्ताने होत आहे. पुण्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळाल्यास पुणे भाजपचा चेहरा मुरलीधर मोहळ होऊ शकतात. सध्या पुण्यात चंद्रकांत पाटील नेतृत्वाखाली भाजप काम करत आहे. मुळात पाटील हे मागील विधानसभेला पुण्यात आले. त्यामुळे त्यांचे मूळ राजकारण हे कोल्हापूर याठिकाणी पाहायला मिळाले. शहराचे नेतृत्व सध्या घडत आहे. 
 
भाजपच्या दृष्टीने पुणे शहर अतिशय महत्वाचे आहे. गेल्या काही वर्षामध्ये भाजपने पुण्यात आपला ठसा उमटवला आहे. २०१४ च्या निवडणुकीमध्ये अनिल शिरोळे यांनी काँग्रेसचे विश्वजीत कदम यांचा पराभव केला. यावेळी शिरोळे आणि बापट हे पुणेकर भाजप चालवताना दिसले. मात्र बापट हे मंत्री असल्यामुळे पुण्यातील भाजप बापटांकडेच राहिली. बापट यांनी अनेक वर्षे पुण्यातील भाजपचे नेतृत्व केले. त्यांच्यानंतर आता मोहळ की अन्य कोण  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मोहळ यांची ओळख आहे. पुण्याचे महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष म्हणून मोहळ यांची कामगिरी उत्तम आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरपासून त्यांनी पुण्यातील भाजप आपल्या हातात घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
 

कलमाडींची छाप

 
पुणे शहरावर अनेक वर्षे सत्ता गाजवलेल्या काँग्रेस पक्षाला एक नेता पाहायला मिळत नाही. आम्ही सामूहिक नेतृत्व करू असे काँग्रेसकडून वारंवार सांगितले जाते. एक असा नेता जो पक्ष कार्यकर्त्यांना आदेश देईल आणि संपूर्ण काँग्रेस एक होईल अशा नेत्याचा सध्या तरी अभाव पाहायला मिळतो. पुणे शहराने काँग्रेसमध्ये अनेक नेतेमंडळी घडवली. माजी खासदार सुरेश कलमाडी यांची पुण्यावर छाप होती. पुण्यात अनेक विकास प्रकल्प आणण्यामध्ये कलमाडी यांना यश आले. कलमाडी आणि काँग्रेस हे एक समीकरणच पुण्यात पाहायला मिळाले.  कलमाडी यांच्यानंतर पुण्याचे नेतृत्व करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र याला यश मिळाले नाही. सध्या पुण्यात माजी आमदार मोहन जोशी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी उपमहापौर आबा बागुल, संजय बालगुडे, आमदार रविंद्र धंगेकर यांच्यासारखी काँग्रेसमध्ये नेते मंडळी आहेत. महाविकास आघाडीला कसबा विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळाले. काँग्रेसने भाजपचा बालेकिल्ला अनेक वर्षांनंतर सर केला. यामुळे काँग्रेसला मोठी ताकद मिळाली आहे. शहरात सत्ता गाजवणारी काँग्रेस पुन्हा एकदा पुण्यात लोकसभा जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्नात आहेत. कसबा जिंकलेले रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देवून पुन्हा एकदा कसबा पॅटर्नची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. असे झाल्यास पुण्यातील काँग्रेसला नेतृत्व मिळू शकते.
 

Related Articles