शिवतारे यांचे बंड अखेर शमले   

पुणे : शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांचे बंड अखेर शमले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या महायुतीतील दोनही पक्षांची बुधवारी मध्यरात्री बैठक झाली. त्यामुळे बारामती लोकसभा मतदरासंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येते.
 
बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही, आता बदला घेण्याची वेळ आलीय, अजितदादांची गुर्मी जाणार नाही, माघार घेणार नाही, अशी एकापेक्षा एक आक्रमक विधाने करीत विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लढण्याचा निर्धार केला. शिवतारे यांच्या निर्धारामुळे या मतदारसंघातून तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे अजित पवारांचे टेंशन वाढले होते. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. या पार्श्वभूमीवर शिवतारे यांनी निवडणूक लढविण्यापासून परावृत्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांच्याशी दोनदा चर्चा केली. मात्र शिवतारे माघार घेण्यास तयार नव्हते. अखेर मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्रित प्रयत्न करून शिवतारे यांची मनधरणी केल्याचे सांगण्यात येते. आता शिवतारे सासवडला शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी झालेल्या बैठकीत पुरंदरचे प्रलंबित असलेले गुंजवणीचे पाणी, आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय बाजार, तसेच अन्य प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले उपस्थित होते.
 

Related Articles