केजरीवाल यांचा कोठडीतील मुक्काम वाढला   

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात येथील न्यायालयाने गुरूवारी केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली. ईडीने केजरीवाल यांना सात दिवसांची ईडी कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने चार दिवसांची कोठडी दिली.
 
याआधी, सुनावलेली ईडी कोठडीची मुदत काल संपणार होती. त्यामुळे केजरीवाल यांना ईडीने राऊस अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हजर केले होते. केजरीवाल हे चौकशीस सहकार्य करत नाहीत. तसेच, ते उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचे सांगितले. या प्रकरणात तीन जणांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत, असेही ईडीने सांगितले.
 
गेल्या आठवड्यात २१ मार्च रोजी ईडीने केजरीवाल यांना अटक केली होती. त्यानंतर, २२ मार्च रोजी न्यायालयाने केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती. केजरीवाल यांनी अटकेस दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या अर्जावर न्यायालयाने हंगामी आदेश देण्यास नकार देतानाच ईडीला नोटीस बजावत त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. त्या अर्जावर ३ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
 
ईडीने नऊ वेळा समन्स बजावूनदेखील केजरीवाल चौकशीस सामोरे गेले नव्हते. याउलट, त्यांनी नवव्या समन्सला न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देताना २२ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर ईडीने त्यांना अटक केली. 
 

Related Articles