मुख्तार अन्सारीचे निधन   

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बांदा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुन्हेगार आणि राजकीय नेता मुख्तार अन्सारी याचा तीव्र हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. छातीत अत्यंत वेदना होऊ लागल्याने तातडीने त्याला बांदा इथल्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मुख्तारला आयसीयूमधून सीसीयूमध्ये दाखल करावे लागणार होते. येथे त्याच्यावर उपचार करण्यासाठी ९ डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली होती. मात्र, त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. समाजवादी पक्षाने ट्विट करत अन्सारीच्या मृत्यूचे वृत्त दिले.दरम्यान, मंगळवारी त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी उपचारानंतर त्याला त्याच दिवशी तुरुंगात पाठवले होते. बुधवारी तुरुंगात त्याच्या प्रकृतीची चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये सर्व काही सामान्य असल्याचे आढळून आले होते. परंतु गुरूवारी तुरुंगातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारादरम्यान अखेर त्याचा मृत्यू झाला. 
 
६० वर्षांचा मुख्तार याने सुनावणीदरम्यान न्यायालयात आरोप केला होता की, तुरुंगात आपली हत्या करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्या जेवणात विष दिले जात असल्याने त्याची प्रकृती बिघडत आहे. दरम्यान, एमपीएमएलए न्यायालयानेही याप्रकरणी तुरुंग प्रशासनाकडून अहवाल मागवला होता. मुख्तारच्या मृत्यूनंतर गाझीपूर आणि मऊसह इतर संवेदनशील जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 
२०१२ मध्ये मुख्तार अन्सारी याने कौमी एकता दलाची स्थापना केली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मुख्तार अन्सारी याने वाराणसीमधून मोदींच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीनंतर २०१७ मध्ये मुख्तार अन्सारी याने कौमी एकता दलाचे बसपामध्ये विलीनीकरण केले. मुख्तार अन्सारी याने १९९६, २००२, २००७, २०१२ आणि पुन्हा २०१७ मध्ये मऊ येथून विधानसभा निवडणूक जिंकली होती.
 

Related Articles