न्यायालयावर विशिष्ट गटाचा दबाव   

६०० हून अधिक वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र

 
नवी दिल्ली : काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि राजकीय अजेंड्याच्या आधारावर न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पत्र ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांच्यासह ६०० हून अधिक वकिलांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लिहिले आहे.या पत्रावर वकील आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्ज्वला पवार, उदय होल्ला, पिंक आनंद आणि स्वरूपमा चतुर्वेदी आदींची स्वाक्षरी आहे.
 
न्यायदानाचे काम करणार्‍या लोकांनी आता आपल्या न्यायसंस्थेला वाचवण्यासाठी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. लोकशाहीचा एक स्तंभ असलेल्या आपल्या न्यायपालिकेला अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येणे आणि याविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. तरच न्यायपालिकेवरील हल्ले रोखता येतील, असा उल्लेख पत्रामध्ये आहे. अशा कठीण प्रसंगी सरन्यायाधीशांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरु शकते. सर्वोच्च न्यायालयाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मौन पाळण्याची ही वेळ नाही, असेही पत्रात म्हटले आहे. यासोबतच, आम्हा सर्वांचा तुमच्यावर आणि सर्व न्यायमूर्तींवर विश्वास आहे, आम्हाला यावर मार्गदर्शन करावे आणि न्यायपालिकेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावे. न्यायपालिकेचा सन्मान आणि प्रामाणिकपणा टिकवण्यासाठी आम्ही आवश्यक ते करण्यासाठी तयार आहोत. आम्ही तुमच्या नेतृत्त्वाकडे आशेने पाहत आहोत, असे पत्रात म्हटले आहे.
 
या पत्रात म्हटल्याप्रमाणे, विशिष्ट लोकांचा गट विविध मार्गांनी कार्यरत असून तो न्यायालयाचा भूतकाळ हा सुवर्ण काळ असल्याची विविध खोटी माहिती प्रसारित करत आहे. यातून वर्तमानातील घडामोडींबद्दल विरोधाभास निर्माण केला जात आहे. न्यायालयीन कामकाज, निकाल यावर प्रभाव टाकणे आणि न्यायालयांवर नैतिक दबाव निर्माण करून राजकीय लाभ उचलण्यासाठी हेतुपुरस्सरपणे अशा गोष्टी केल्या जात आहेत.
 

इतरांना घाबरवणे, धमकावणे ही काँग्रेसची परंपरा : मोदी

 
नवी दिल्ली : देशभरातील सहाशे वकिलांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतरांना घाबरवणे आणि धमकावणे ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे, असे म्हटले आहे.न्यायसंस्थेवर दबाव टाकू पाहणार्‍या समाज गटाबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र सहाशे वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधींशा लिहिले आहे. काही विशिष्ट लोक स्पष्ट न्याय व्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकणार्‍या आणि राजकीय भूमिकेच्या आधारे न्यायालयाची बेअदबी करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. 
 
ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे आणि इतर सहाशे वकीलांनी हे आरोप केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला काही निकाल राजकारणाशी संबंधित आहेत.काही राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून, त्यांच्याशी संबंधित प्रकरणात दिल्या जाणार्‍या निकालावर आणि संबंधित प्रकरणात दिल्या जाणार्‍या निकालावर प्रतिक्रिया देऊन न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यात न्यायालयाला धमकावले जात असून, लोकशाही व्यवस्थेलाच धोका निर्माण झाला आहे, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
 

Related Articles