माजी मंत्री सावित्री जिंदाल भाजपमध्ये   

चंडीगढ : ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा आणि हरयानाच्या माजी मंत्री सावित्री जिंदाल यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर, त्यांनी हिस्सार येथील एका कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या आठवड्यातच सावित्री जिंदाल यांचे पुत्र आणि प्रसिद्ध उद्योगपती नवीन जिंदाल यांनी  काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
 
मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सावित्री जिंदाल यांना पक्ष प्रवेश पार पडला. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी आपण काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची पोस्ट केली होती.मी आमदार म्हणून १० वर्षे हिस्सारचे प्रतिनिधित्व केले आणि मंत्री म्हणून निस्वार्थपणे हरयानाची सेवा केली. हिस्सारची जनता हे माझे कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
 
देशातील सर्वांत श्रीमंत महिला म्हणून सावित्री जिंदाल यांची फोर्ब्स इंडियाने नोंद केली आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, दिवंगत उद्योगपती आणि माजी मंत्री ओ.पी. जिंदाल यांच्या पत्नी सावित्री जिंदाल यांची संपत्ती २९.१ अब्ज डॉलर्स आहे. सावित्री जिंदाल या भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होत्या. २०१४ मध्ये भाजपच्या डॉ. कमल गुप्ता यांनी त्यांचा पराभव झाला होता. गुप्ता हे सध्या नायब सिंग सैनी सरकारमध्ये मंत्री आहेत.
 
२००४-१४ या कालावधीत काँग्रेस खासदार म्हणून लोकसभेत कुरुक्षेत्र मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे नवीन जिंदाल हेदेखील नुकतेच काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता सावित्री जिंदाल यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला. 
 

Related Articles