जुळ्या बहिणींसह चौघांचा नदीत बुडून मृत्यू   

भोपाळ : मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात सहलीसाठी गेलेल्या चार जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला. या चौघांमध्ये दोन १९ वर्षांच्या जुळ्या बहिणी आणि २१ आणि २२ वर्षांच्या दोन तरूणांचा समावेश आहे. ही घटना टिकरी टोला गावाच्या हद्दीतील सोन नदीजवळ घडली. 
 
घुंघुटी पोलीस चौकीचे प्रभारी भूपेंद्र पंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहडोल येथील आठजण बुधवारी उमरिया जिल्ह्यात सहलीसाठी आले होते. यामध्ये दोन १९ वर्षीय जुळ्या बहिणींचाही समावेश होता. या दोन जुळ्या बहिणी आणि त्यांच्यासोबत दोन तरूण सोन नदीत पोहायला गेले. मात्र, पोहता येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही बुडाले. काही वेळानंतर त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसू लागले. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चारही मृतदेह पाण्यातून बाहेर काढून ते मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
 

Related Articles