गुरुद्वारामध्ये कर सेवा प्रमुखाची हत्या   

डेहराडून/रुद्रपूर : उत्तराखंडमधील उधम सिंग नगर जिल्ह्यातील नानकमत्ता साहिब गुरुद्वाराचे डेरा कर सेवा प्रमुख बाबा तरसेम सिंग यांची गुरुवारी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली, अशी माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली.बाबा तरसेम सिंग यांना तातडीने खातिमा येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे उधम सिंग नगरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मंजू नाथ यांनी पत्रकारांना सांगितले. या हत्येचा तपास विशेष तपास पथकामार्फत केला जाणार आहे.
 
दोन्ही हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. ते दोघेही शीख आहेत. त्यांच्या ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.
उधम सिंग नगर जिल्ह्यातील रुद्रपूर-टनकपूर मार्गावर तलद्रपूरपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर काल सकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली.
 
तरसेम सिंग हे गुरुद्वारा परिसरात एका खुर्चीवर बसले होते. त्यावेळी दोघे हल्लेखोर मोटारसायकवरून आले. हल्लेखोरांनी अगदी जवळून सिंग यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक समोरुन तर दुसरी पाठीमागच्या बाजूने गोळी झाडली. त्यानंतर, हल्लेखोर मोटारसायकलवरुन पसार झाले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. गोळीबारानंतर सिंग जमिनीवर कोसळले, त्यावेळी गुरूद्वारामधील एक व्यक्ती तेथे पळत आली. अन्य काहींच्या मदतीने सिंग यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 

Related Articles