शिवसेनेच्या शिंदे गटाचे आठ उमेदवार जाहीर   

  1. रामटेक वगळता सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी

  2. नाशिक, ठाणे, कल्याण, पालघर, वायव्य मुंबईचा निर्णय नाही

 
मुंबई, (प्रतिनिधी) : भाजपने नाशिकबरोबरच ठाणे आणि पालघर मतदारसंघांवर दावा सांगितल्याने भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दुसरीकडे, शिंदे यांच्या शिवसेनेने गुरूवारी आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई), हेमंत पाटील (हिंगोली), संजय मंडलीक (कोल्हापूर) यांच्यासह सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर रामटेक मतदारसंघातून कृपाल तुमाने यांच्या ऐवजी काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
 
भाजपने ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला ठाम नकार दिला आहे. नाशिकच्या जागेचाही तिढा आहे. 
 
पालघरची जागा मागच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपकडून हिरावून घेतली होती. ती त्यांना आता परत हवी आहे.वायव्य मुंबईचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर शिंदे यांच्यासोबत असले तरी तेथे शिवसेनेच्या ठाकरे गटाने कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्याने तेथील उमेदवार बदलण्याचा शिंदे यांच्या शिवसेनेचा विचार आहे. तर भाजपने ही जागा मागितली आहे. त्यामुळे हा निर्णयही रखडला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे कल्याणचे खासदार आहेत. परंतु, त्यांचेही नाव पहिल्या यादीत नाही.
 

भाजपच्या दांडगाईमुळे शिंदे गटात नाराजी

 
भाजपने पाहणीच्या अहवालाचा हवाला देऊन शिवसेनेच्या जागांवर दावे सांगितल्याने शिंदे गटात नाराजी आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करताना भाजपची दांडगाई अशीच सुरू राहिली तर टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया वृत्तवाहिन्यांशी बोलताना व्यक्त केली. भाजप आमच्या जागांसाठी एवढा हट्ट कशासाठी करत आहे? भाजपच्या जागा आम्ही मागितल्या का? असा सवाल त्यांनी केला. असेच सुरू राहिले तर एक घाव दोन तुकडे करावे लागतील, असा इशारा खोतकर यांनी दिला आहे. लोकसभेलाच जर असे असेल तर विधानसभेला भाजप काय करेल?  असा प्रश्न शिंदे गटाचे नेते करत आहेत. भाजपकडून मात्र मतभेदांचा इन्कार केला. आमच्यात कोणतेही गैरसमज नाहीत. सर्व चर्चा योग्य रीतीने सुरू आहेत. आमचे तिन्ही नेते एकत्र बसून ४५ हून अधिक जागा कशा निवडून येतील याचीच तयारी करत असल्याचे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
 

हे आहेत उमेदवार

 
राजू पारवे- रामटेक
राहुल शेवाळे- मुंबई द.म.
संजय मंडलिक- कोल्हापूर सदाशिव लोखंडे- शिर्डी 
प्रतापराव जाधव- बुलढाणा 
हेमंत पाटील- हिंगोली
श्रीरंग बारणे- मावळ
धैर्यशील माने- हातकणंगले

Related Articles