रामटेकच्या काँग्रेस उमेदवाराचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई राजकीय द्वेषातून : पटोले   

मुंबई, (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असल्याचे चित्र देशात आहे. या पराभवाच्या भीतीने भाजपला ग्रासले असून त्याच भीतीतून ते विरोधी पक्षांच्या विरोधात कारस्थान करत आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई ही राजकीय सूडबुद्धीतून केलेली आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
 
गोंदियामध्ये पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, रामटेक मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले असले, तरी घाबरण्याचे कारण नाही, काँग्रेस पक्षाने त्या मतदारसंघात दुसरा अर्ज आधीच दाखल केलेला आहे. परंतु, भाजप घाबरलेला असून ते खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत. स्वाभाविक आहे की सत्तेतून बाहेर जाण्याची भीती भाजपला सतावत असल्याने अशा प्रकारचे राजकारण ते करत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली, तर शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीने नोटीस पाठवली, हे सर्व प्रकार पराभवाच्या मानसिकतेतून विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी भाजप करत आहे.

Related Articles