संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत भाविकांची गर्दी   

लेण्याद्री, (वार्ताहर) : संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील ‘श्री गिरीजात्मज’ गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.  परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यानिमित्ताने श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवस्थानचे वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. 
 
त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गिरिजात्मज गणेशाच्या मूर्तीस व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवाचे नैवेद्याकरिता जुन्नर येथील सतीश कवडे यांनी विविध प्रकारची फळे दिलीत. मंदिरात सकाळी ६ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात देवस्थानच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. ही महाआरती उल्हास तांबे, विजय लोखंडे, शैलेश बनकर, प्रविण ताजणे, नितीन थोरात व अमित मोरे या मान्यवरांच्या हस्ते विधिवत अभिषेक करून करण्यात आली, तसेच देवस्थानच्या वतीने या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 
 
देवस्थानच्या वतीने प्रत्येक संकष्टी व विनायकी चतुर्थीस महाआरतीचे आयोजन केले जाते. याकरिता इच्छुक भाविकांनी देवस्थान ट्रस्टचे कार्यालयाशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी. देवस्थानचे वतीने दिवसभर विविध धार्मिक विधी करण्यात आले.भाविकांना देवस्थान ट्रस्टमार्फत विविध सोयी सुविधा पुरविण्यात आल्या. भाविकांची व पर्यटकांची दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. 
 

Related Articles