घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात अपुर्‍या सोयींमुळे रुग्णांची हेळसांड   

भीमाशंकर, (वार्ताहर) : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना मिळणार्‍या अपुर्‍या सोयींमुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. नादुरूस्त रुग्णवाहिका, मुख्य वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात वेळेवर येत नसल्याने इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी रुग्णांची तपासणी, काळजी व्यवस्थित घेत नसल्याने हे ग्रामीण रुग्णलायच सलाईनवर आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. 
 
घोडेगाव येथे असलेल्या ग्रामीण रूग्णालयामध्ये आंबेगाव व खेड तालुक्याच्या आदिवासी भागातील व घोडेगाव परिसरातील नागरिक या रूग्णालयात येत आहेत. येथे कार्यरत असलेले मुख्य वैद्यकीय अधिक्षक कोण आहे हे रूग्णांनाच माहीत नाही. ते कधी येतात, कधी येत नाहीत. त्यामुळे ओपीडी करणारे डॉक्टर सकाळ, संध्याकाळ हजर आहेत की नाहीत, तसेच इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी रूग्णांना व्यवस्थित सेवा देतात की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य डॉक्टर हजर नसतात. हे मुख्य डॉक्टर गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या संपर्कात राहात असल्याने रूग्णालयाबाबत रूग्णांच्या नातेवाईकांची काही तक्रार आल्यास संबंधित नागरिक यामध्ये मध्यस्थी करतात, असा आरोप रूग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. 
 
घोडेगाव ग्रामीण रूग्णालय येथे दोन रूग्णवाहिका असून, एक नादुरूस्त, तसेच चालक नसल्याने धूळ खात असून रूग्णांना तातडीची सेवा मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. तर शासनाकडून १०८ क्रमांक डायल केल्यावर पुरविली जाणारी रूग्णवाहिका सेवा ही खरंतर अनेक रूग्णांसाठी जीवनदायी ठरली आहे.
 
मात्र सध्या या भागात ही रूग्णवाहिका वेळेवर येत नाही. तीन दिवसांपूर्वी घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात पहाटे तीन वाजता आणलेल्या गर्भवती महिलेस दाखल केले. नंतर सकाळी ९ वा. मंचर येथे हलवावे लागेल असे सांगितले. मात्र ग्रामीण रूग्णालयात नादुरूस्त व चालक नसलेल्या रूग्णवाहिका असल्याने अखेर रूग्णांच्या नातेवाईकांनी १०८ क्रमांक डायल केला. मात्र दोन ते अडीच तास वाट पाहूनही १०८ रूग्णवाहिका न आल्याने अखेर संबंधित रूग्णांच्या नातेवाईकांनी खासगी वाहनाने मंचर येथे संबंधित महिलेला नेले असल्याचे युवराज काळे यांनी सांगितले.
 
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील नागरिकांना १०८ रुग्णवाहिकेचा लाभ वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार किसान सभेने केल्या. यासाठी आंदोलनेही केली. मात्र संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी अंमलबजावणी न करता आश्वासनाशिवाय दुसरे काहीही दिले नाही.
 

Related Articles