खेड-शिवापूर टोलवर एक एप्रिलपासून वाढ   

पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर एक एप्रिल पासून टोलच्या दरात वाढ होणार आहे. दरवाढीबाबात प्रशासनातर्फे पत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे, अशी माहिती टोल रस्ता विभागीय प्रमुख अमित भाटिया यांनी दिली आहे. टोल रोड प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाच्या करारानुसार दरवर्षी टोलचे दर वाढत असतात. यावर्षी १ एप्रिल २०२४ पासून सुमारे अडीच टक्के टोल वाढ होणार आहे. प्रवाशांनी या टोल वाढीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
या वाढणार्‍या टोल वसुलीमध्ये चारचाकी व हलक्या वाहनांसाठी टोलच्या दरात पाच रुपयांची वाढ होणार आहे. मागील वर्षी घेण्यात येणार ११५ रुपये दर आता १२० होणार आहे, हलक्या व्यावसाईक वाहनांच्या टोल दरातही पाच रुपयांची वाढ होत असून या वाहनांना १८५ ऐवजी १९० रुपये द्यावे लागणार आहेत. बस, ट्रकसाठी दहा रुपयांची वाढ होणार आहे. आता ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर जड वाहनांसाठी ४१५ रुपयांवरुन पाच रुपये वाढून ४२० रुपये होणार आहे. याबरोबरच अवजड वाहनांसाठीच्या ६१५ रुपये टोलमध्ये १५ रुपयांची वाढ होणार आहे. अवजड वाहनांना आता ६३० रुपये टोल द्यावा लागणार आहे.
 
मासिक पासमध्ये देखील १ एप्रिल पासून दहा रुपयांची वाढ होणार आहे.  आता मासिक पास ३४० रुपये होणार आहे. सर्वच स्थानिक वाहन चालकांकडून टोल वसुलीसाठी वरिष्ठ व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. स्थानिकांनी ३४० रुपयांचा मासिक पास घेऊन सहकार्य करावे, अशी आम्ही विनंती करणार असल्याचे विभागीय व्यवस्थापक अमित भाटिया यांनी सांगितले.
 

Related Articles