सुट्टीच्या दिवशी महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू   

पुणे : चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र आज (शुक्रवारी) पासून ते ३१ मार्चपर्यंत सलग तीन दिवस सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.
 
सध्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला मोठा वेग देण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकी, तसेच चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी दि. २९ ते ३१ मार्चपर्यंत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरु आहे. ही कटू कारवाई, तसेच नियमानुसार पुनर्जोडणी शुल्काचा भरणा, वीज नसल्याने गैरसोय होणे टाळण्यासाठी थकीत वीजबिलाची रक्कम ताबडतोब भरावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात 
आले आहे.
 
वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही ऑनलाइनद्वारे थकीत व चालू वीजबिल भरण्याची सोय www.mahadiscom.in या संकेतस्थळावर, तसेच महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे उपलब्ध आहे. तसेच ५ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे बिल असणार्‍या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.
 

Related Articles