मावळात आता श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात लढत   

नंदकुमार सातुर्डेकर

 
पिंपरी : बरेच दिवस घोळ घालत अखेर मावळातून महायुतीची उमेदवारी शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यात लढत होणार आहे. श्रीरंग बारणे यांनी  सन २०१४ च्या निवडणुकीत त्या वेळचे शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांचा पत्ता कट करून तिकीट मिळवले. 
 
शिवसेनेच्या तिकिटावर पाच लाख १२ हजार २२३ मते मिळवून ते विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी कामगार पक्षाचे लक्ष्मण जगताप यांना तीन लाख ५४ हजार ८२९ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी दिलेले अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांना एक लाख ८२ हजार २९३ मते मिळाली. आपचे मारुती भापकर यांना ३० हजार ५६६ मते मिळाली. बहुजन समाज पक्षाचे भिमपुत्र टेक्सास गायकवाड यांनी २५ हजार ९८२ मते घेतली.
 
खरेतर  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळात पार्थचे नाव पुढे आले. तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ’... ज्यांनी पक्ष संघटना बांधली त्या कार्यकर्त्यांचे काय?’ असा प्रश्न करत विरोध दर्शविला होता मात्र कौटुंबिक कलह नको म्हणून  त्यांनी पार्थला उमेदवारी जाहीर केली  
 
’ठेच लागली की, माणसे शहाणी होतात’ असे सूचक विधानही केले. पवार यांची भीती  खरी ठरली. पार्थचा २ लाख १५ हजारांहून अधिक मतांनी करून सेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले. श्रीरंग बारणे यांना सात लाख २० हजार ६६३ तर पार्थ पवार यांना पाच लाख चार हजार ७५० मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना ७५ हजार ९०४ मते मिळाली.
 
खरेतर त्यावेळी  सहापैकी केवळ कर्जतमध्ये सुरेश लाड यांच्या रूपाने राष्ट्रवादीचा आमदार आहे. प्रशांत ठाकूर, लक्ष्मण जगताप,  बाळा भेगडे (भाजप), मनोहर भोईर, गौतम चाबुकस्वार (सेना) हे राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून आले  पिंपरी  महापालिका, तळेगावसह अनेक सत्तास्थाने भाजपच्या ताब्यात आहेत. २०१४ च्या विधानसभेला चिंचवडमधून भाजपचे लक्ष्मण जगताप व सेनेचे राहुल कलाटे यांना मिळून १लाख ८७ हजार २७२ मते होती  तर पिंपरीत सेनेचे गौतम चाबुकस्वार आणि आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांना मिळून ९८हजार ३८४ मते होती. हे लक्षात घेता नवख्या  पार्थसाठी मावळची ही लढाई अवघड होती. तरीही अजित पवार यांनी  शेकापचा पाठिंबा, मनसेची मदत, पिंपरी  महापालिकेतील राष्ट्रवादीच्या ३६ नगरसेवकांची ताकद या बळावर जुगार खेळला. मात्र त्यांची फसगत झाली ज्यांना  पवार यांनी  भरभरून दिले ते नगरसेवक पैशाची वाट पाहत बसले. पवार यांनी पदाधिकार्‍यांना पदरमोड करण्याचे केलेले आवाहन अनेकांच्या पचनी पडले नाही . पक्षातील  गाववाले मंडळींनी नात्यागोत्याचे राजकारण करून पवारांना तोंडावर पाडले. त्यामुळे पार्थ पराभूत झाले. संसदीय कामकाजाचा अनुभव, युतीचा हक्काचा मतदार, भाजप शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांच्याशी झालेली  दिलजमाई, शहरी मतदारांचा वाढलेला टक्का, पनवेल व चिंचवडचा भक्कम पाठिंबा या बळावर बारणे विजयी झाले. त्यामुळे अजित पवार यांचे पुन्हा शहरात पाय रोवण्याचे स्वप्न भंगले.
 
चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अजित पवार यांनी लक्ष घातले. परिणामी भाजपाच्या अश्विनी जगताप यांचा विजय होत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना सुमारे लाखभर मते मिळाली. मात्र काही काळातच अजित पवार हे राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे मागील पराभवाचा वचपा करण्यासाठी अजित पवार हे श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारी कात्री लावणार अशी चर्चा सुरू होती. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी मावळच्या जागेवर दावा केला होता. त्यामुळे यावेळी महायुती भाकरी फिरवणार की काय अशी चर्चा होती. मात्र पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांनी तिकिटाबाबत बाजी मारली आहे. 
 
महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्याशी बारणे यांची लढत होणार आहे. वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड शहराचे महापौरपद भूषविले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. २०१४ पासून लोकसभेसाठी ते इच्छुक होते मात्र २०१४ मध्ये राहुल नार्वेकर आणि  २०१९ मध्ये पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने वाघेरे यांची निवडणूक लढविण्याची संधी हुकली. तरीही राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाघेरे यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली होती. 
 
यावेळी महायुतीत निवडणूक लढविण्याची संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश  केला. त्याचवेळी त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले होते 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगड येथील सभेतच  वाघेरे यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर काल बुधवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वाघेरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. 
 
लगेचच आज महायुतीच्या वतीने शिवसेनेच्या वाट्याला गेलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आता या मतदारसंघात श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात सामना रंगणार आहे. हा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनेच्या वाटेला गेलेले नाराज झालेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या निवडणुकीत आतून काय करतात तसेच वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघात कोण उमेदवार देणार यावरही या मतदारसंघाचे गणित ठरणार आहे.
 

Related Articles