महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार   

आमदार सुनील शेळके यांचा यू-टर्न

 
पिंपरी : मावळच्या खासदारांनी गेल्या दहा वर्षात केलेले काम दाखवा, असा सवाल करून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीस विरोध केलेले मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी यू टर्न घेतला आहे. जोवर अधिकृत घोषणा होत नाही तोवर आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो काही निर्णय घेतला आहे. त्यानुसार महायुतीच्या उमेदवाराच्या आम्ही पाठीशी राहू, असे प्रतिपादन त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले.
 
आमदार शेळके म्हणाले की, मी गेल्या चार महिन्यापासून मावळची जागा राष्ट्रवादीला देण्यासाठी आग्रही होतो आणि आहे जोवर अधिकृत घोषणा होत नाही तोवर आम्ही आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे, तसेच महायुतीतील अन्य पक्षाचे नेते यांच्याकडे केला आहे. या मतदारसंघात आमचे वर्चस्व आहे मात्र अजित पवार जो निर्णय घेतील त्यानुसार त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही राहू. आपली चार महिन्यांपूर्वीची भाषा आणि आत्ता आपण बोलत असलेली मावळ भाषा पाहता आपण यू टर्न घेतला आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता आमदार शेळके म्हणाले की, मी कोणताही यू टर्न घेतलेला नाही. सरळ रन वे आहे. माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. शेवटी युतीधर्म पाळला पाहिजे. जोपर्यंत अधिकृतरित्या उमेदवाराची घोषणा होत नाही तोवर आपल्या पक्षाच्या पदाधिकार्‍याला न्याय देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, ते मी केले, असे शेळके म्हणाले.
 

Related Articles