थोर क्रांतिकारकाचा जाज्वल्य इतिहास   

रुपेरी पडदा : कल्पना खरे 

 
देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्याचे आपण देणे लागतो असे सावरकर म्हणत असत ते देणे चुकवण्यासाठी रणदीप हुडा यांनी काढलेला ‘हू किल्ड हिज स्टोरी’ या टॅगलाइनसह ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा मराठी चित्रपट सध्या प्रदर्शित होत आहे. त्याद्वारे सर्वांसाठी विशेषत: नवीन पिढीसमोर या महान क्रांतिकारकाचा धगधगता इतिहास उलगडून दाखवला आहे. 
 
चित्रपटाच्या सुरुवातीलाच १८९६ च्या सुमारास देशात पसरलेली प्लेगची महामारी, त्यावेळी इंग्रजांनी भारतीयांवर केलेले अत्याचार दाखवले आहेत. प्लेग झालेल्या रुग्णास इंग्रज जिवंत जाळताना पाहूनच लहान विनायकाच्या मनात इंग्रजांविरुद्ध आत्यंतिक चीड निर्माण होते. त्यातूनच ते थोरल्या भावासह देशसेवेची शपथ घेतात आणि अभिनव भारत संघटनेची स्थापना करतात. या संघटनेच्या माध्यमातून युवकांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. या कामाबद्दल जहालवादी विचारसरणी असलेल्या लोकमान्य टिळकांना माहिती समजते. ते सावरकरांना कायद्याची माहिती व्हावी म्हणून लंडनला पाठवण्यासाठी साहाय्य करतात.
 
लंडनला गेल्यावरही ते मादाम बिकाजी कामा, मदनलाल धिंग्रा यांच्या समवेत अभिनव भारतची शाखा सुरू करतात. त्यांचे काही सहकारी इंग्रज अधिकार्‍यांची हत्या करतात. त्यामुळे सावरकरांना अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवण्यात येते.म. गांधीजींची अहिंसा आणि सावरकरांची सशस्त्र क्रांती या दोन विचारधारांची लढाई स्पष्ट करण्यावरच चित्रपटात भर दिलेला आहे. 
 
रणदीप हूडा सावरकरांची भूमिका अक्षरश: जगला आहे. चेहरेपट्टीत साम्य, त्यांच्या सारखी शरीरयष्टी दिसण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतलेली जाणवते. विशेषत: कोठडीत असताना किडलेले दात, फुटक्या चष्म्याआड मिचमिचणारे डोळे या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. 
 
सिनेमॅटोग्राफीद्वारे १९व्या शतकातील काळ उत्तम उभा केला आहे. अनेक ठिकाणी तत्कालीन फोटो, फिल्म जोडणे अपरिहार्यच आहे. चित्रपटाच्या अखेरचे रॅप साँग प्रभावी आहे.
 
चित्रपटातील काही दृश्ये हृदयद्रावक आहेत. जहाजातून समुद्रात मारलेली उडी, कारागृहातील बंधुभेट, घरी आल्यावर भाजी-भाकरीचे साधेच जेवण जेवतानाचा प्रसंग, खुदीराम बोस, चापेकर बंधू इत्यादींना झालेली फाशी हे सर्व पाहताना डोळे पाणवल्याशिवाय राहात नाहीत. सावरकरांच्या पत्नी, यशोदाबाईंच्या भूमिकेत अंकिता लोखंडेने सुरेख अभिनय केलाय. तिला पडद्यावर फारसा वाव नसला तरी लक्षात राहते. काही व्यक्तिरेखांमधील कलाकारांची निवड काहीशी खटकते. एकदंरीत चित्रपट प्रत्येकाने आवर्जून पाहावा असाच आहे.
 

स्वातंत्र्यवीर सावरकर

 
लेखक, दिग्दर्शक : रणदीप हूडा
कलाकार : रणदीप हूडा, अंकिता लोखंडे, अमित सियाल, भक्ती क्लेइन, हरनाम सिंग
 

Related Articles