हार्नियाची शस्त्रक्रिया झालेल्या सूर्यकुमारच्या प्रकृतीत सुधारणा   

मुंबई : पहिल्या दोन पराभवामुळे संकटात सापडलेल्या मुंबई इंडियन्ससाठी फलंदाज सूर्यकुमार यादवची प्रतीक्षा अजून वाढली आहे. या आयपीएलमध्ये अजून काही सामने तो खेळू शकणार नाही, असे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून (एनसीए) सांगण्यात आले.
 
हार्नियाची शस्त्रक्रिया झालेल्या सूर्यकुमारच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु त्याला मैदानावर येण्यासाठी अजून काही सामने थांबावे लागेल, असे एनसीएकडून स्पष्ट करण्यात आले. मुंबई इंडियन्सचा पुढचे तीन सामने १, ७ आणि ११ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत.जागतिक ट्वेन्टी-२० प्रकारात फलंदाजीत अव्वल स्थानावर असलेल्या सूर्यकुमार यादवची उणीव मुंबई इंडियन्स संघाला जाणवत आहे. 
 
या आयपीएलमध्ये मुंबईने पंजाब संघाविरुद्धचा सामना अखेरच्या षटकांत चार धावांच्या फरकाने गमावला होता. आयपीएलनंतर लगेचच होणार्‍या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी सूर्यकुमार पूर्णपणे तंदुरुस्त रहाणे हे भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहे, म्हणून एनसीएस त्याला आयपीएलमध्ये खेळवण्यासाठी घाई करणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. भारताकडून ६० ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्‍या सूर्यकुमारने चार शतकांसह १७१.५५ च्या स्ट्राईक रेटने २,१४१ धावा केलेल्या आहेत. गत आयपीएलमध्येही सुरुवातीला सूर्यकुमार यादव काही सामने खेळू शकला नव्हता.
 

Related Articles