मेहनत घेतल्याशिवाय यश नाही : चंदू बोर्डे   

पुणे : प्रत्येक खेळामध्ये जर तुम्हाला तुमचे लक्ष साध्य करायचे असेल तर मेहनत घेतल्या शिवाय ते साध्य होणार नाही. सध्याच्या प्रत्येक खेळात चुरस निर्माण झाली आहे. त्यासाठी प्रत्येक खेळाडूला आटोकाट प्रयत्न करावे लागत आहेत. तुम्ही सर्व आता ज्या स्तरापर्यंत पोहोचला आहात त्यासाठी तुम्हालाही खूप मेहनत घ्यावी लागली आहे. त्यामुळे मेहनतीशिवाय यश मिळत नाही, असे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व दोन वेळा निवड समितीचे अध्यक्षपद भूषविलेले चंदू बोर्डे यांनी खेळाडूंना याप्रसंगी मार्गदर्शन केले.
 
चंदू बोर्डे फाऊंडेशनच्या वतीने (सीबीएफ) गेल्या दोन वर्षापासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करून त्यांच्या भविष्यातील त्यांच्या कार्यसाठी फुल ना फूलाची पाकळी म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी पुण्यातील सात विविध खेळातील खेळाडूंना प्रत्येकी २५ हजार रूपयांचा धनादेश देऊन बोर्डे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी चंदू बोर्डे यांच्या पत्नी विजया बोर्डे, मुलगा उदय बोर्डे, सून वैशाली उदय बोर्डे यांच्यासह खेळाडूंचे पालक उपस्थित होते.
 
भारतीय क्रिकेटमध्ये १९५० ते ६०च्या दशकात कसोटी क्रिकेट खेळलेले खेळाडू चंदू बोर्डे यांनी ही संस्थेची स्थापना केली आहे. भारत सरकारने चंदू बोर्डे यांचा पद्मश्री, पद्मभूषण, अर्जुन , तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कर्नल सी. के. नायडू पुरस्काराने गौरवले आहे. समाजाला आपण काही तरी देणे लागत आहोत त्यासाठी खेळाडूंसाठी आपण काही तरी केले पाहिजे या उद्देशाने श्री. चंदू बोर्डे यांनी आपले कुटुंब, तसेच मित्रपरिवाराच्या सहकार्याने चंदू बोर्डे फाऊंडेशनची स्थापना केली. क्रीडा, संस्कृती, कला आदी विभागात सर्वोत्तम कामगिरी करणाजया गुणवान मुलांचा गौरव करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.
 
समाजाच्या कल्याणासाठी धर्मादाय काम करण्याच्या उद्देशाने कंपनी कायदा २०१३ विभाग ८ अंतर्गत नोंदणीकृत असलेली चंदू बोर्डे फाऊंडेशन ही एक संस्था स्थापन करण्यात आली आहे. या वर्षी या शिष्यवृत्तीचे मानकरी ठरलेले खेळाडू पुढील प्रमाणे....
 
१) वैष्णवी पवार (तिरंदाजी), रेणुका साळवे (अंध ज्युदोपटू), राधिका दराडे (सायकिलंग), निकिता सिंग (क्रिकेट), क्रिश शहापूरकर, रिषभ बन्सल, हर्षल मिश्रा (सर्व क्रिकेट)
 

Related Articles