‘महा’आघाडीचे तुकडे? (अग्रलेख)   

उद्धव ठाकरे गट, काँग्रेस व शरद पवार यांचा गट यांना पैसा, साधन सामुग्री यांची कमतरता सतावत आहे. त्यातच उमेदवार कोठून आणायचे आणि जनतेचा पाठिंबा कसा मिळवायचा हे प्रश्नही उभे आहेत.
 
आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे विरोधी पक्षही जोरात धडपड करत आहेत. विरोधी पक्षांनी ’इंडिया’ नावाने एक आघाडी स्थापली आहे. त्यात नेमके किती पक्ष आहेत हे सध्या सांगणे अवघड झाले आहे. या पक्षांचाच एक गट महाराष्ट्रात ‘महा विकास आघाडी’ या नावाने ओळखला जातो. त्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस व शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस असे प्रमुख पक्ष आहेत. अन्य ‘सम विचारी’ पक्ष व संघटनांना बरोबर घेण्याचा त्यांचा मानस आहे. तूर्तास कोण कोणाबरोबर आहे आणि ही आघाडी अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न उभा राहिला आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’ हा एक पक्ष आहे. प्रकाश आंबेडकर त्याचे नेते आहेत. हा पक्ष ‘महा विकास आघाडीत’ येणार की नाही यावर गोंधळ होता. ‘वंचित’ने नऊ उमेदवार जाहीर केले. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा ही आघाडी एकत्र लढणार आहे. त्यासाठी जागा वाटपावर अनेक दिवस चर्चा सुरुच आहे; मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटाने परस्पर १७ उमेदवार जाहीरही केले. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला. नैऋत्य मुंबई, भिवंडी आणि सांगली या जागा काँग्रेसला हव्या होत्या. तेथे उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिल्याने ‘पुढे काय‘ हा प्रश्न काँग्रेस व आघाडीसमोर आहे.
 

‘महा युती’तही गोंधळ

 
पूर्वीच्या एकत्र शिवसेनेने गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांपैकी काही जागांवर उद्धव गटाने उमेदवार जाहीर केले आहेत. सांगलीची जागा २०१४पर्यंत काँग्रेस कायम जिंकत असे. त्यामुळे ती जागा पेचपूर्ण ठरली आहे. किमान महाराष्ट्रात तीन पक्षांनी मिळून भारतीय जनता पक्षापुढे आव्हान उभे करावे असे ठरवून हे तिघे चर्चा करत होते. असे असताना उद्धव यांच्या गटाने एकदम उमेदवार का जाहीर केले? हा प्रश्न अनुत्तरित आहे. शिवसेनेने म्हणजे उद्धव यांच्या गटाने आपल्या निर्णयाचा फेर विचार करावा, आघाडी धर्म पाळावा असे काँग्रेसने म्हटले आहे. उद्धव गटाने काही जागा आपल्यासाठी घेतल्याने त्यापैकी किमान चार-पाच जागांमध्ये बंडखोरी होण्याची काँग्रेसला भीती आहे. शरद पवार यांच्या गटाचे बरेच उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत. कदाचित त्यावरूनही आघाडीतील धुसफुस वाढू शकते. ‘वंचित’ने नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याचे जाहीर केले असले तरी सांगलीत ते महाविकास आघाडी बरोबर नाहीत. यामुळे संभ्रम वाढणार आहे. उद्धव ठाकरे गटाला शह देण्यासाठी भाजपने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेण्याचे ठरवलेले दिसते. त्याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. ‘मनसे’ने लोकसभेच्या तीन जागा मागितल्या आहेत. महाराष्ट्रात ‘महा युती’त भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार  यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट असे तीन पक्ष आधीच आहेत. त्यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यातच मनसे हा चौथा खेळाडू आल्यास ‘महायुती’तील गोंधळ वाढेल. माढा, सातारा व नाशिक या जागांसाठी अजित पवार यांचा गट आग्रही आहे. त्या पक्षातही या मुद्द्यावरून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने येत्या निवडणुकीत ४००  जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवल्याचे भाजप सांगत आहे; पण त्यांनाही मित्र पक्षांची कमतरता जाणवत आहे. ओडिशात सत्तारूढ बिजू जनता दलाने भाजपशी युती करण्याचे नाकारत ‘एकला चलो रे’चे धोरण स्वीकारले आहे. तेथे भाजपला याच पक्षाचे मोठे आव्हान आहे. पंजाबात अकाली दलाशी युती करण्याचे घाटत होते. खुद्द अमित शहा यांनी तसे सांगितले होते; पण अकाली दलानेही भाजपला टाळले आहे. पंजाबात भाजपसमोर अकाली दलापेक्षाही ‘आप’चे आव्हान मोठे आहे. स्वबळावर लढण्याच्या बाता मारणे वेगळे आणि प्रत्यक्ष मतदार संघात मतदारांना सामोरे जाणे वेगळे असते याचा अनुभव भाजपलाही आहेच; मात्र महाराष्ट्रात तरी ‘महाविकास आघाडी’ टिकते की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याने भाजपचा कदाचित फायदा होऊ शकतो.
 

Related Articles