चारित्र्यसंपन्न देशभक्त - दत्ताजी ताम्हणे   

गाऊ त्यांना आरती : शिरीष चिटणीस
प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषद
 
स्वातंत्र्यलढ्यात आपल्या आयुष्याची राखरांगोळी केलेल्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्यकर्तृत्वावरच आजचा बलशाली भारत उभा आहे. सर्वांना मतदानाचा प्रथम अधिकार देणारे राष्ट्र म्हणजे भारत. कविवर्य वि.वा. शिरवाडकर - कुसुमाग्रज यांच्या ओळी देशभक्त, स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील संघर्ष वाचताना-आठवताना आपले मन उल्हसित करतात. ते आपल्या कवितेत म्हणतात...
पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती,
होऊनिया बेहोश धावलो ध्येय पथावरती,
कधी न थांबलो विश्रांतीस्तव पाहिले न मागे,
बांधू न शकलो प्रीतीचे वा कीर्तीचे धागे,
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार,
गर्जा जयजयकार क्रांतीचा! गर्जा जयजयकार |
 
आपले आयुष्य स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतर आजन्म अविवाहीत राहून समाजासाठी देशासाठी अर्पण करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी म्हणजे दत्तात्रय बाळकृष्ण ताम्हणे. सर्वजण त्यांना दत्ताजी ताम्हणे म्हणूनच ओळखायचे.
 
’खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही साने गुरुजींची शिकवण आयुष्यभर अंगिकारलेल्या दत्ताजी ताम्हणे यांचा जन्म १३ एप्रिल १९१३ रोजी रत्नागिरी येथे झाला. लहानपणापासून घरातील वातावरण देशभक्तीने भारलेले! त्यांचे वडील बाळकृष्ण ताम्हणे पोस्टमास्तर म्हणजे ब्रिटीशांच्या नोकरीमध्ये. घरी नऊ मुलांचा संसार करायचा म्हणजे नोकरी टिकवायला हवी, पण टिळक भक्तीत व सावरकर भक्तीत खंड पडला नाही. कार्यालयाचे काम पूर्ण झाल्यावर घरी येऊन - दरवाजे बंद करून केसरी वृत्तपत्राचे वाचन सर्व कुटुंबियासमवेत करीत. केसरीमधील लोकमान्य टिळकांच्या लेखनाच्या अनुषंगाने येणारे विचार संस्काररूपाने ताम्हणे कुटुंबियावर झाले.
 
या सर्व काळात दत्ताजी ताम्हणे यांचे प्राथमिक शिक्षण श्रीवर्धन, हर्णे अशा ठिकाणी झाले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले आणि त्यांची आई मुलांना घेऊन कोकण सोडून ठाण्यामध्ये राहायला आल्या. ठाण्यात एम. एच. हायस्कूल व बी.जे. हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. त्यानंतर दत्ताजी ताम्हणे यांनी इंजिनिअरींगसाठी व्ही.जे.आय.टी.मध्ये प्रवेश घेतला. तो काळ होता प्रखर स्वातंत्र्यलढ्याचा. महात्मा गांधीजींच्या भाषणाने प्रेरीत होऊन दत्ताजी ताम्हणे यांनी स्वतःला स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले.
 
असहकार आंदोलन
 
लाखो देशभक्त तरुणांच्या मनामध्ये महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाने अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ व ताकद दिली. आम्हाला स्वातंत्र्य हवे, आम्ही आमचा देश बलशाली बनवू या एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या या तरुणाईने जगातील आगळावेगळा स्वातंत्र्यलढा यशस्वी केला. खड़्ग नाही, ढाल नाही, बंदूक नाही, तरीही युद्ध जिंकायला निघालेले हे महात्माजींचे सैन्य जगावेगळे होते.
 
दत्ताजी ताम्हणे यांचा ध्येयाप्रती मार्ग या काळात निश्चित झाला. सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी निदर्शने झाली, काळे झेंडे दाखवून ‘सायमन गो बॅक’ म्हणून घोषणा दिल्या गेल्या. त्यामध्ये दत्ताजी ताम्हणे होते. १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात ते पकडले गेले; पण प्रौढ वय नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले.
 
मिठाचा सत्याग्रह या आंदोलनात दत्ताजी ताम्हणे यांनी एक सायक्लोस्टाइल मशीन शाहीर लीलाधर हेगडे यांचे मोठे भाऊ रमाकांत हेगडे यांच्या चेंदणी येथील घरी आणले व दोघेही त्या मशीनवर बुलेटिन्स काढू लागले. दत्ताजी ताम्हणे यांना कलेक्टर कचेरीतून निरोप आला. म्हणून भेटायला गेले असता तुम्ही हेगड्यांच्या घरी बुलेटिन्स काढता असे ऐकले आहे ते काम बंद करा. नाहीतर अटक करू, अशी ताकीद देण्यात आली.
 
त्यानंतर ते मशीन दुसरीकडे हलविण्यात आले. या काळात ते समाजकारण- राजकारण यामध्ये अग्रेसर म्हणून काम करीत असत. १९३५ च्या घटना कायद्यान्वये जेव्हा भारताला काही राजकीय अधिकार मिळाले, तेव्हा ते भारतीयांना अपुरे आहेत हे माहित असल्यामुळे ते अमान्य होते. कायद्याने दिलेली घटना आम्ही तात्पुरती स्वीकारीत आहोत; पण त्यावेळी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना लोकांसाठी काम करण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका व इतर यंत्रणा मिळत असल्याने संधीही मिळत होती; पण त्या काळात स्वातंत्र्यसैनिकांची घोषणाच होती घटना मोडण्यासाठी आम्ही घटना राबवीत आहोत.
 
दोन वर्षासाठी कारावास
 
दत्ताजी ताम्हणे यांना पहिला कारावास दोन वर्षासाठी सोसावा लागला तो १९४२ मध्ये. ८ ऑगस्ट १९४२ या दिवशी गोवालिया टँक मैदानावर म्हणजे आजच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर महात्मा गांधीजींचे आवेशपूर्ण भाषण झाले. या संयोजनामध्ये त्यांचा सहभाग असल्याने ब्रिटीश पोलिसांनी दत्ताजी यांना अटक केली व ठाणे जेलमध्ये आणले आणि कारावासात टाकले. दत्ताजी ताम्हणे यांना ज्यांनी घडविले, त्यांच्या विचारांना आकार दिला, दिशा दिली व त्यागमय जीवन जगण्याची प्रेरणा दिली त्यामध्ये महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया, एस.एम.जोशी, साने गुरुजी, नानासाहेब गोरे, अच्युतराव पटवर्धन, सेनापती बापट यांचा व अन्य अनेकांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे.
 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मिठागर कामगारांच्या लढ्यात तीन महिने, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहा महिने, आणीबाणीच्या सत्याग्रहात १९ महिने, ठाणे जिल्यातील पर्नळी किसानांचे आंदोलन ६ महिने, तर कधी महिना पंधरा दिवसाच्या शिक्षा भोगताना तुरूंगात त्यांना खूप काही शिकायला मिळाले. अनेक पुस्तकांचे वाचन आणि पाऊण लाखावर पृष्ठांचे परिशीलन त्यांच्याकडून या बंदीकाळातच झाले. चर्चा, वाद-विवाद, व्याख्याने, गाणी बजावणी, बंगाली व उर्दू भाषेचे धडे, होमिओपॅथीचा परिचय, ’ब्रिज’ खेळातील बारकावे, टेनिस खेळाचे धडे, गप्पागोष्टी, गमती जमती, हास्य विनोद, अभ्यासवर्ग, विविध स्पर्धा, सामुदायिक वाचन, एकमेकांचे वाढदिवस, कीर्तन, गणेशोत्सव, काव्यगायन, पाकशास्त्रातील नैपुण्य आदि अनेक प्रकारच्या तुरूंगातील उपक्रमांमधून दत्ताजी ताम्हणे यांचे जीवन बहुश्रुत व बहुआयामी होण्यास मोलाची मदत झाली. कारावास घडला नसता तर राजकीय जीवनात आपण अपरिपक्व राहिलो असतो अशी त्यांची भावना होती.
 
मिठाच्या सत्याग्रहात दत्ताजी ताम्हणे यांना आयुष्याचा उत्कट क्षण सापडला तो महात्मा गांधीजींच्या सानिध्यात. साबरमती ते दांडी या मिठाच्या सत्याग्रहात ते सामील झाले आणि गांधीमय झाले. सत्य, अहिंसा आणि खादीचे व्रत कवचकुंडलासारखी त्यांच्या आयुष्याला व्यापून राहिली. खादी अंगावर आली ती शेवटपर्यंत आचरणानेही त्यांनी सांभाळली. सेवाग्राम आश्रमात त्यांना स्वावलंबनाचा धडा मिळाला. त्यांनी सेवाग्राममध्ये मैला पाटीने डोक्यावरून वाहण्याचे काम केले. भूदान चळवळीत दत्ताजी ताम्हणे आचार्य विनोबा भावे यांच्या सोबत राहिल्याने त्यांचा सहवास त्यांना लाभला. ठाणे जिल्ह्यात शंकरराव देव यांच्यासमवेत हजारो एकर जमीन या चळवळीत त्यांनी मिळवली. त्याचे भूमीहिनांना वाटप केले. या सर्व वाटचालीत त्यांच्या सर्व भावंडांनी त्यांना साथ दिली.
 
१९५२ मध्ये आमदारकीसाठी ते उभे राहिले परंतु पराभूत झाले. १९५७ मध्ये ते आमदार झाले आणि ग.प.प्रधान यांच्यासारख्या मित्राबरोबर विधानसभा गाजवली. खासदारकीसाठी उभे राहिले परंतु पराभूत झाले. पुन्हा १९६८ मध्ये विधानपरिषदेवर निवडून येऊन ज्या ज्या वेळी आमदार म्हणून संधी मिळाली, त्या-त्या काळात महाराष्ट्रातील गोर-गरीबांसाठी कार्यरत राहिले. १९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून दत्ताजी ताम्हणे यांना निवडण्यात आले; पण त्याही काळात नाराजी, कुरबुर, रूसवे, फुगवे होतेच. समितीचे ठाणे शहराचे सरचिटणीस पं. कृ. भडकमकर यांनी त्यांना आमदारकीचे तिकीट मिळण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबिला. वयोवृद्ध सेनापती बापट, आचार्य अत्रे हे भडकमकर यांच्या घरी गेले. त्यासाठी ते पुण्याहून खास चेंदणी (ठाणे) येथे आले व सेनापती बापट यांच्या विनंतीवरून भडकमकर यांनी आपले उपोषण सोडले.
 
न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हणे यांच्याबद्दल असे म्हंटले आहे... चरित्र सर्वांनाच असते; पण चारित्र्य असतेच असे नाही; पण दत्ताजींचे चरित्र हे संपूर्ण चारित्र्यमय आहे. जे इतिहास घडवितात त्यांना तो लिहून काढण्यास वेळही नसतो. इमर्सनचे एक वाक्य ते उद्धृत करतांना लिहितात इतिहास म्हणजे थोरामोठ्यांचे चरित्रच असते. निष्कलंक चारित्र्य ही सर्व कलांमधील अतिसुंदर कला आहे. गुणांचा अथवा व्यक्तिमत्वाचा विकास एकांतात होऊ शकतो; पण चारित्र्याची निर्मिती समाजात, लोकात राहूनच होत असते. कारण परीक्षेचे, कसोटीचे क्षण तिथेच असतात आणि दत्ताजी या कसोटीस आणि परीक्षेत पूर्णपणे यशस्वी ठरले आहेत. लोकांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचा समदुःखी होणारा तपस्वी म्हणजे दत्ताजी ताम्हणे होय.
 
राष्ट्रीय पुरस्कार
 
अशा या व्यक्तिमत्वाचा वयाच्या ९२व्या वर्षी २००४ मध्ये राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजसेवकांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ऑगस्ट क्रांतीदिनाला राष्ट्रपती भवनात सत्कार केला गेला. ८ ऑगस्ट १९४२ या दिवशी अटक झालेल्या या स्वातंत्र्यसैनिकाच्या राष्ट्रसेवेचा सरकार दरबारी सन्मान झाला. गौरव करणारी व्यक्ती आणि गौरवमूर्ती या दोघांतही विलक्षण साम्य! दोघेही महान देशप्रेमी; दोघेही सौजन्य मूर्ती; दोघेही व्यासंगी; दोघेही कर्मयोगी; दोघेही ब्रम्हचारी; दोघांच्याही पुढे मागे घराणेशाही नाही; दोघेही धर्मशील पण धर्मांध नसलेले; दोघेही साहित्यिक, साहित्याच्या माध्यमातून लोकजागृती करणारे. हा खरोखरच मणीकांचन योग! अशा या स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हणे यांचे निधन ७ एप्रिल २०१४ रोजी झाले. त्यांना शंभर वर्षांचे दीर्घ, निरोगी आयुष्य लाभले.
 
म्हणूनच ज्ञानपीठ विजेते कविवर्य वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) म्हणतात.
कशास आई भिजविसे डोळे, उजळ तुझे भाल,
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल.
सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते,
उठतिल त्या ज्वालांतून भावी क्रांतीचे नेते.
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई खळखळा तुटणार ॥
 

Related Articles