वाचक लिहितात   

प्रदूषणातही आघाडीवर!

 
स्वित्झर्लंडमधील गोल्डच शहरातील ’आयक्यू एअर’ या स्विस प्रदूषण तंत्रज्ञान कंपनीने नुकताच जागतिक वायू गुणवत्ता अहवाल २०२३ प्रकाशित केला. या अहवालानुसार भारत हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा प्रदूषित देश ठरला आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वाधिक ५० प्रदूषित शहरांपैकी ४२ शहरे एकट्या भारतातील आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक शहरे बिहार आणि हरयाना व उत्तर प्रदेश या दिल्लीला लागून असलेल्या राज्यातील असून जगभरातील सर्वाधिक प्रदूषित शहर बिहारमधील बेगुसराय हे आहे. त्यापाठोपाठ गुवाहाटी व देशाची राजधानी दिल्ली या दोन शहरांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो. या शहरांशिवाय ग्रेटर नोएडा (११ वा क्रमांक), मुझफ्फरनगर (१६), गुरगाव (१७), पाटणा (२०), फरिदाबाद (२५), मीरत (२८), गाझियाबाद (३५), रोहतक (४७) या शहरांचा या यादीत समावेश आहे. भारताची प्रदूषणाची पातळी ५४.४ मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतकी असून प्रमाणित मानकापेक्षा १० पटीने अधिक आहे. जगातील १३४ देशांतील ७ हजार ८१२ शहरांचा वायू प्रदूषणाच्या संदर्भात तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. वायू प्रदूषणामुळे भारताचा अंदाजे १५० अब्ज डॉलर (भारताच्या जीडीपीच्या ५.४ टक्के) इतका खर्च होतो. भारतातील एकूण वायू प्रदूषणाच्या २० ते ३५ टक्के प्रदूषण हे केवळ वाहतुकीमुळे होते. विविध उद्योग, रासायनिक उद्योग, औष्णिक विद्युत प्रकल्प हे प्रदूषण करणारे इतर घटक आहेत. अशा गंभीर परिस्थितीत वाहतुकीसाठी अक्षय ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याची गरज आहे.
 

प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई 

प्रदूषणाचा भस्मासुर रोखा

प्रदूषणाबाबतचा स्विस संस्थेचा अहवाल देशातील नागरिकांची झोप उडवणारा आहे. आज देशातील सर्वच महत्त्वाची शहरे प्रदूषणाने गुदमरत आहेत. त्या शहरात राहणार्‍या नागरिकांचे जीवन प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवले जात आहे, तर दुसरीकडे याच शहरांची फुप्फुसे प्रदूषणाने निकामी होत आहेत. प्रदूषणामुळे शहरातील नागरिकांना फुप्फुसाचे, हृदयाचे, रक्ताभिसरणाचे आजार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक आहे. वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणात भर पडत आहे. अनेक कारणांमुळे प्रदूषणाचा आलेख उंचावत आहे. स्विस संस्थेने जाहीर केलेला हा अहवाल म्हणजे धोक्याची घंटा आहे. दगड खाणींवर नियंत्रण आणायला हवे. वाहनांची संख्याही कमी करायला हवी. प्रसंगी सम-विषमसारखे कठोर निर्णय घ्यायला हवेत.

श्याम ठाणेदार, दौंड, जिल्हा पुणे

काही प्रश्न जनता विचारू शकते

रविवार केसरी (दि.२४ मार्च) मधील राही भिडे यांचा ’इंडिया’ आघाडीला पुन्हा बळ हा लेख काँग्रेसचे तरुण नेते राहुल गांधी यांची स्तुती करणारा आहे. भारतभर भ्रमंती करताना सामान्य नागरिकांत मिसळणे, त्यांच्याकडे जेवणे, त्यांच्या छोट्या मुलांचे लाड करणे, युवक-युवतींशी संवाद साधणे, शेतकरी/ कामगारांबरोबर त्यांची कामे करणे यासारखे नेहरूंपासून गांधी घराण्याचे जे हातखंडे आहेत ते त्यांनी वापरून झाले. भाषणंही प्रभावी वक्तृत्व दाखवणारी आहेत हेही लेखात म्हटले आहे. मग त्यांच्या भाषणातील सकल राष्ट्रीय उत्पादन, बेरोजगार आकडेवारी, जीएसटी लागू करणे इत्यादी संबंधातील तपशील / संदर्भ यातून करमणूक करणार्‍या ध्वनिचित्रफिती कशा प्रसारित होतात? त्यांची मोडतोड करून त्या समाजमाध्यमांवरून अग्रेषित केल्या जातात, किंवा कसे? 
 

श्रीपाद कुलकर्णी, पुणे 

मानवी आयुष्याचा अंदाज 

डेन्मार्कमधील शास्त्रज्ञ मानवाच्या आयुष्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यामुळे मानव किती जगेलं याचा अंदाज लावता येईल. एका बातमीनुसार कोट्यवधी लोकांची माहिती यासाठी गोळा केली जात आहे. डेन्मार्कमध्ये सुमारे ६० लाख लोकांची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्याचे विश्लेषण करून त्यासंबंधी आयुष्याचा अंदाज बांधता येईल. शास्त्रज्ञांनी जेव्हा मृत्यूचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो अंदाज सुमारे ७८ टक्के बरोबर आला होता. जर माणसाचा मृत्यू अगोदर सांगता आला किंवा त्यासंबंधी अंदाज बांधता आला तर काय होईल? याची कल्पना केलेली बरी... एक म्हणजे माणूस अकार्यक्षम किंवा निराश होईल. त्याला जीवनात काही रहस्यच राहणार नाही. आज माणसाला मृत्यू केव्हा येणार हे माहीत नसल्यामुळे तो काम करतो. काही ध्येये समोर ठेवतो. जीवनात आनंद घेतो व जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न करतो; पण जेव्हा मृत्यू कळेल तेव्हा त्याची अवस्था अत्यंत विलक्षण होईल. आज शास्त्र खूपच पुढे गेले आहे. मृत्यू केव्हा येईल याचे जसे संशोधन चालू आहे, तसेच माणसाचे आयुष्य कसे वाढवता येईल याचेही संशोधन चालू आहे. एवढे मात्र खरे की पूर्वी सहा-सात दशकांपूर्वीचे माणसाचे आयुष्य आता वाढले आहे हे निश्चित. वैद्यकीय सुविधा, सकस आहार यामुळे तो पूर्वीपेक्षाही जास्त आयुष्य जगत आहे. 
 

शांताराम वाघ, पुणे

 

Related Articles