दानवे षटकार मारणार की थेट बाद होणार?   

ऋषिकेश पोटरे पाटील

 
जालना लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजपकडून सलग सहाव्यांदा उमेदवारी जाहीर झाली. मात्र महाविकास आघाडीकडून दानवेंच्या विरोधात कोण लढणार हे अजून निश्चित झाले नाही. जालना मतदार संघ हा काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. काँग्रेसचे उमेदवार एकूण आठ वेळा येथून निवडून आले आहेत. भाजपचे देखील एकूण आठ वेळा उमेदवार येथून निवडले गेले असून, आतापर्यंत समसमान विजय दोन्ही पक्षाने या मतदार संघातून मिळवले आहे. १९९६ पर्यंत या लोकसभा मतदारसंघात बहुतांश वेळा काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. पण १९९६ पासून या ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. १९९६ आणि १९९८ मध्ये भाजपचे उत्तमसिंह पवार विजयी झाले. त्यानंतर १९९९ पासून रावसाहेब दानवे जिंकत आले आहेत.
 
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे विलास औताडे यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचा दानवेंनी दोनही निवडणूकीत अनुक्रमे २ लाख आणि ३ लाख मतांच्या फरकाने पराभव केला. परंतू २००९ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याणराव काळे यांनी दानवेंना तगडी झुंज देत चांगलाच घाम फोडला होता. काळे यांचा अवघ्या ८ हजार ४८२ एवढ्या कमी मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला. यावेळी देखील त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी त्यांनी विधानसभा मतदारसंघात भेटीगाठी घेण्यास प्रारंभ केला आहे. 
 
दानवे यांचा बालेकिल्ला असणारा भोकरदन मतदार संघामधून त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. जालना मतदार संघात भाजप- शिवसेना युती मधून सलग पाच वेळा दानवे निवडून गेले आहेत. परंतू यावेळची राजकीय परिस्थिती ही वेगळी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे मतांची विभागणी होणार असून याचा फटका दानवेंना बसण्याची दाट शक्यता आहे. कारण, या मतदार संघात शरद पवार गट आणि ठाकरे गट यांना मानणार्‍या मतदारांची संख्या मोठी आहे. त्यात मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा झाली असून येत्या ३० मार्च पर्यंत जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. ते वंचितची साथ देणार की अपक्ष उमेदवार देतात काही दिवसात समजेलच. परंतु जर अपक्ष उमेदवार दिला तर मात्र जालन्यात तिरंगी लढत होऊ शकते. 
 
दानवे विरुद्ध दानवे
 
जालना लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात. त्यात जालन्यातील भोकरदन, जालना, बदनापूर आणि छत्रपती संभाजीनगर मधील पैठण, फुलंब्री, सिल्लोड यांचा समावेश आहे. सिल्लोड हा मतदार संघ सर्वात मोठा मतदार संघ असून शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार तेथील विद्यमान आमदार आहेत. जालना विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसकडे असणारा एकमेव मतदार संघ आहे. तर पाच मतदार संघात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आहे. त्यामुळे दानवेंना जरी हे सोपे वाटत असले तरी भोकरदनमध्ये शरद पवार गटाची मोठी ताकत आहे. बदनापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड या चारही मतदार संघात ठाकरे गटाचा मोठा मतदार वर्ग आहे. त्यामुळे जागा वाटपात ठाकरे गटाला संधी मिळाली तर दानवेंची मोठी अडचण होऊ शकते. तसे झाल्यास ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी देऊन दानवे विरूध्द दानवे असा ही संघर्ष रंगू शकतो.
 
दानवेंचे कट्ट्रर विरोधक असणारे जालन्याचे शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी २०१९ च्या लोकसभेत दानवेंविरोधात दंड थोपटले होते. सिल्लोडचे  शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांना पाठींबा दर्शवत मदत करणार असल्याचे सांगितले होते. परंतू तत्कालीन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत दोघांचे मनोमीलन घडवून आणले. त्यामुळे युती काळात दानवेंना निवडून येणे सोपे झाले. आता खोतकर शिंदे गटात असल्याने दानवेंना खोतकरांची भिती नाही. 
 

मराठा आरक्षणाचे केंद्र

 
जालना गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाचे केंद्र बनला आहे. मराठा आरक्षणा संदर्भात ज्या मागण्या होत्या त्या राज्य सरकारने मान्य न करता मराठा समाजाची दिशाभूल केल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट यांच्यावर मराठा समाजाची नाराजी आहे. त्याचा फटका रावसाहेब दानवेंना बसण्याची शक्यता आहे. दानवें यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख जरी चढता असला तरी विकासाच्या बाबतीत मतदार संघातील मतदार मात्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावेळच्या लोकसभेच्या मैदानात दानवे षटकार मारणार की,थेट बाद होणार हे येणारा काळच ठरवेल.

Related Articles