भारतीय कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी प्राणहानी टळली   

अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्याकडून कौतुक

 
अमेरिकेत बाल्टिमोर येथे मालवाहू जहाज धडकल्याने पूल कोसळला. डाली नावाच्या या जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत वेळीच यंत्रणांना इशारा दिला नसता, तर या अपघाताची तीव्रता कित्येक पटींनी वाढली असती, याकडे सध्या लक्ष वेधले आहे. वेळीच धोक्याचा इशारा दिल्याने पुलावरील वाहनांची रहदारी थांबवणे शक्य झाले आणि मोठी प्राणहानी टळली. अपघातातील सहा जण बेपत्ता आहेत. भारतील खलाशांच्या या समयसूचकतेचे स्थानिक मेरिलॅन्ड प्रशासनासह थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही कौतुक केले.
 
डाली या महाकाय मालवाहू जहाजावरील सर्व २२ कर्मचारी भारतीय आहेत. अशाच पद्धतीने जगभरात बरीच मालवाहू जहाजे पूर्णपणे किंवा बहुतांश प्रमाणात भारतीय कर्मचाऱ्यांच्या बळावर मार्गक्रमण करत आहेत. बाल्टिमोरच्या अपघातामुळे भारतीय खलाशांचे सागरी कौशल्य पुन्हा एकदा नव्याने जगासमोर आले असले, तरी भारतीय मनुष्यबळाचे शिपिंग उद्योगातील स्थान वादातीत आहे. जगभरातील वस्तूंच्या व्यापारापैकी ९० टक्के व्यापार हा जलवाहतुकीमार्गे होतो. भारतीय खलाशी नसतील, तर या संपूर्ण व्यापाराला मोठा फटका बसू शकतो.
 
सिंगापूर मालवाहू जहाजाच्या भारतीय क्रू मेंबर्सच्या कामाचे कौतुक करताना मेरीलँडचे गव्हर्नर वेस मूर म्हणाले, 'बाल्टीमोरमधील पुलावर जहाज धडक देण्यापूर्वीच भारतीय क्रू मेंबरांनी लगेच इशारा दिला होता. त्यामुळे आम्ही तातडीने पावले उचलली आणि अनेकांचा जीव वाचवण्यात यश आले.’ सिंगापूरचे  मालवाहू जहाज बाल्टिमोरमध्ये पुलाच्या खांबाला धडकण्यापूर्वीच मुख्य खलाशी आणि इतर क्रू मेंबरच्या मालवाहू जहाजाने इशारा दिला होता. त्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे थांबवली होती.
 
या जहाजावरती सिंगापूरचा ध्वज होता, या जहाजाने बाल्टिमोरमधील धडक दिली. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जहाजामधील क्रू मेंबरर्सना कोणतीही इजा झालेली नाही. ते सर्व सुरक्षित आहेत. कर्मचाऱ्यांनी हे पळाला आदळू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. 
 

भारताचा खलाशी पुरवण्यात तिसरा क्रमांक 

 
जागतिक पातळीवर शिपिंग उद्योगाला मनुष्यबळ पुरवणाऱ्या देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे. पहिल्या दोन स्थानांवर चीन आणि फिलिपाइन्स हे देश आहेत. केंद्र सरकारच्या जहाज वाहतूक महा संचालनालयाच्या आकडेवारीनुसार, जगभरातील १० टक्के खलाशी भारतातून येतात. सन २०१३ ते २०१७ या अवघ्या चार वर्षांत भारतीय खलाशांची संख्या ४२ टक्क्यांनी वाढली. या बाबतीत भारत चीनच्या काहीसा मागे आहे. जगभरातील ३३ टक्के खलाशी हे चीनमधून येतात. मात्र काही बाबतीत मूलभूत फरक आहे. चिनी खलाशी हे प्रामुख्याने चिनी जहाजांवर काम करतात, तर भारतीय खलाशी भारतीय तसेच परदेशी जहाजांवरही काम करतात. त्यामुळे भारतीय खलाशी अधिक जागतिक आहेत. भारताने अधिकाधिक जहाजांची बांधणी आणि व्यवस्थापन सुरू केले की, यात फरक पडेल.
 

दर्जेदार मनुष्यबळ पुरवण्यात भारत अग्रस्थानी 

 
भारत दीर्घकाळापासून 'इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशन'च्या 'व्हाइट लिस्ट'मध्ये समाविष्ट आहे. 'एसटीसीडब्ल्यू-९५' चे करार आणि संकेतांक यांचे पूर्णपणे अनुपालन करणारे सदस्य देश निश्चित करण्यासाठी ही यादी तयार केली जाते. देशातील योग्य खलाशी परवाना यंत्रणा, प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापन, ध्वज राष्ट्र नियंत्रण (ध्वजधारी जहाजांवर नियंत्रणासाठी उपाययोजना) आणि बंदर राष्ट्र नियंत्रण (देशातील बंदरांत परदेशी जहाजांवर योग्य सरकारी नियंत्रण) या निकषांवर या यादीत समावेश केला जातो. भारताचा या 'व्हाइट लिस्ट'मध्ये असलेला समावेश हे भारतील खलाशांना सेवेत घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्या उत्सुक असण्याचे महत्त्वाचे कारण आहे.
 

Related Articles