‘वंचित’ची वेगळी चूल; महाविकास आघाडीला धक्का   

मुंबई,  (प्रतिनिधी) : अपेक्षेप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी महविकास आघाडीत सहभागी न होता स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा करत आपले ९ उमेदवार जाहीर केले. मराठा आरक्षण लढ्याचे नेते जरांगे-पाटील व ओबीसी बहुजन आघाडीच्या नेत्यांसोबत आपली चर्चा सुरू असून, नव्या समीकरणाची मांडणी करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
 
भाजप विरोधातील लढाईत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा महविकास आघाडीच्या नेत्यांचा सातत्याने प्रयत्न सुरू होता. गेले दोन महिने यासाठी चर्चा सुरू होत्या. वंचित आघाडीला आधी तीन जागा सोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल पुन्हा देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी आंबेडकर यांनी महविकास आघाडी सोबत येण्याचे आवाहन करताना त्यांना पाच जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती. पण, हा प्रस्तावही अमान्य करत आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’ ची घोषणा दिली आहे. काल अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली.
 
आमच्यासोबत जे आघाडी करण्यासाठी इच्छुक होते, त्यांना आम्ही सांगितले की, महाराष्ट्रात जरांगे-पाटील फॅक्टर लक्षात घ्या. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण, तो फॅक्टर लक्षात घेतला गेला नाही. मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. ते राजकीय पक्ष स्थापन करणार नाहीत. त्यामुळे आमची आघाडी होणार नसली, तरी एकत्रितपणे काम करण्याबाबत येत्या आठवड्यात चर्चा करून निर्णय घेऊ. जरांगे पाटील यांचे वंचितला पूर्ण समर्थन आहे. याशिवाय ओबीसी बहुजन पक्ष हा ओबीसींचा नवा पक्ष स्थापन झाला आहे. या पक्षाकडून सांगली मतदारसंघातून प्रकाश शेंगडे निवडणूक लढवणार आहेत. ते लढले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. 
 
भाजपने मुस्लिम समाजाला बाजूला टाकण्याचे राजकारण सुरू केले आहे. त्याला थांबविण्यासाठी मुस्लिम आणि जैन समाजालाही उमेदवारी देऊन त्यांना जिंकून आणण्याचे आम्ही ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले.आंबेडकर यांनी मागच्या निवडणुकीत एमआयएम सोबत आघाडी करून महविकास आघाडीची अडचण केली होती. यावेळी त्यांनी जरांगे व ओबीसी बहुजन पार्टी सोबत राजकीय शक्ती उभी करण्याचे सूतोवाच केले आहे. 
 
नऊ उमेदवार जाहीर
संजय गजानन केवट (भंडारा-गोंदिया)
हितेश पांडुरंग मढावी (गडचिरोली-चिमूर)
राजेश वारलूजी बेल्ले (चंद्रपूर)
वसंत राजाराम मगर (बुलढाणा)
प्रकाश आंबेडकर (अकोला)
प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान (अमरावती)
प्रा. राजेंद्र साळुंके (वर्धा)
खेमसिंग प्रतापराव पवार (यवतमाळ-वाशिम)
 

Related Articles