शिवसेनेकडून १७ उमेदवारांची पहिली यादी   

सांगली, वायव्य मुंबईत ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; काँग्रेस संतापली

 
मुंबई, (प्रतिनिधी) : आठवडाभर बैठका घेऊनही काही जागांचा गुंता सुटत नसल्याने अखेर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने बुधवारी वादातील सांगली व वायव्य मुंबईसह १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबईतून अमोल कीर्तिकर, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, तर छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, माजी मंत्री विश्वजित कदम यांच्यासह काही नेत्यांनी दिल्लीला धाव घेतली आहे.
 
महविकास आघाडीत काही जागांबाबत अजूनही चर्चा सुरू असताना ठाकरे गटाने काल १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. याशिवाय आणखी ५ जागा आम्ही लढवणार असून, लवकरच तेथील उमेदवार जाहीर केले जातील, असे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना मुंबईतील ५ जागांसह २२ जागा लढणार असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याची काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
 
काल जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर (धाराशिव), संजय जाधव (परभणी) भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), अरविंद सावंतल(दक्षिण मुंबई), विनायक राऊत (सिंधुदुर्ग - रत्नागिरी), राजन विचारे (ठाणे) या विद्यमान खासदारांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अनंत गीते (रायगड), चंद्रकांत खैरे (संभाजीनगर), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), चंद्रहार पाटील (सांगली), संजोग वाघेरे (मावळ), नरेंद्र खेडेकर (बुलढाणा) संजय देशमुख (यवतमाळ वाशिम) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
 
यादी जाहीर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी  शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्रात एकूण २२ जागांवार लोकसभा निवडणूक लढणार असून उर्वरित ५ जागावरील उमेदवार लवकरच जाहीर केले जातील यांनी सांगितले.
 
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्यापूर्वीच ठाकरे गटाने आम्ही २२ जागा लढणार असल्याचे जाहीर करून १७ उमेदवारही जाहीर केल्याने काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी, काही जागांवर चर्चा सुरू आहे आणि आपण आघाडीत आहोत, तेव्हा आघाडी धर्म पाळणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगत आपली नाराजी व्यक्त केली. सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसची त्या जागांबाबत आग्रही मागणी आहे, अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही, असे असतानाही त्या जागांवरून उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही. आघाडी धर्माचे पालन सर्वांनीच केले पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा, असेही थोरात म्हणाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली. माजी मंत्री विश्वजित कदम, सांगलीतून लढण्यासाठी इच्छुक असलेले विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिल्लीला धाव घेतली असून, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांची ते भेट घेणार आहेत.

संजय राऊत यांच्याकडून समर्थन 

 
काँग्रेसच्या आक्षेपांना उत्तर देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उमेदवारी जाहीर करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. कोल्हापूर येथून काँग्रेसने छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर केली तेव्हा तेथे आमचे खासदार असतानाही आम्ही विरोध केला नाही. रामटेक ही सुद्धा शिवसेनेची जागा आहे. तेथेही काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे सांगलीबाबत कोणी हरकत घेत असेल, तर ते चुकीचे असल्याचे राऊत म्हणाले.
 

Related Articles