निरुपम यांचा बंडाचा इशारा   

मुंबई,  (प्रतिनिधी) : ठाकरे गटाने मुंबई वायव्य मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी बुधवारी पक्ष नेतृत्वावर जोरदार टीका करत बंडाचे निशाण फडकावले. शिवसेनेला अवास्तव जागा सोडून काँग्रेसने स्वतःलाच श्रद्धांजली वाहिली आहे. हा निर्णय बदलावा, अन्यथा आपल्यासमोरील सर्व पर्याय खुले आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कोव्हिड काळात खिचडी गैरव्यवहार केल्याचे आरोप असणार्‍या खिचडी चोराचा आपण प्रचार करणार नाही, असा निर्वाणीचा इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे. सांगली व वायव्य मुंबईच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असताना उद्धव ठाकरे गटाने या दोन्ही जगांसह १७ मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले. विद्यमान खासदार गजानन किर्तीकर शिंदे यांच्यासोबत गेलेले असताना ठाकरे गटाने त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली. २०१९ च्या निवडणुकीत गजानन किर्तीकर यांच्याविरुद्ध पराभूत झालेले काँग्रेसचे संजय निरुपम येथून पुन्हा एक निवडणूक लढावण्यासाठी इच्छुक होते. अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर होताच निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गट आणि काँग्रेस नेतृत्वावर खरमरीत टीका केली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वांकडून आपली अपेक्षा होती. २०१९ ला निवडणूक हरल्यानंतर मी माझ्या मतदारसंघात सक्रिय आहे. त्यामुळे या जागेवरून निवडणूक लढवण्याचा मला अधिकार आहे. परंतु, उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर काँग्रेस अकारण दबली गेली आहे. शिवसेनेचे स्वतःचं काही अस्तित्व नाही. त्यांची ताकद मर्यादित आहे. तरीही त्यांच्यासमोर आम्ही झुकलो आहोत. एकप्रकारे काँग्रेसला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे, अशी टीका निरुपम यांनी केली.
 
काँग्रेस नेतृत्वाने नेहमीच भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला आहे. परंतु, आता ज्या उमेदवारावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्याच उमेदवाराला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. कोव्हिड संकटाच्या काळात परप्रांतीय मजुरांसाठी जी खिचडी घेण्यात आली त्यात दलाली घेणार्‍याला उमेदवारी दिली गेली. काँग्रेसच्या नेत्यांना हे दिसले नाही का? असा सवाल निरुपम यांनी केला. पक्षाच्या नेतृत्वालाच पक्षाची चिंता राहिलेली नाही. गेल्या १५-२० दिवसांपासून माझी कोणाशीही चर्चा झाली नाही. माझी अपेक्षा काय आहे? माझी अपेक्षा पूर्ण करण्याकरता काय करता येईल, अमुक एक गोष्ट करू शकत नाही, तर दुसरे काय करू शकतो? असे मला कोणीही विचारलेलं नाही.
 

Related Articles