एनडीए पुन्हा बहुमताने येणार   

गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 
नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. केंद्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार बहुमताने सत्तेत येईल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
 
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गडकरी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) नेते प्रफुल्ल पटेल हे उमेदवारी अर्ज दाखल करताना गडकरी यांच्यासमवेत उपस्थित होते.
 
गेल्या दोन टर्मपासून गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी २०१४ मध्ये पहिली लोकसभा निवडणूक काँग्रेसचे सात वेळा खासदार विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात लढवली होती. तसेच, २ लाख ८५ हजार मतांनीं त्यांचा पराभव केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गडकरींनी काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांचा २ लाख १६ हजार मतांनी पराभव केला होता. गडकरी यांना ६,६०,२२१ मते मिळाली होती. तर, पटोले यांना ४,४४,२१२ मते पडली होती.
 
मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नागपुरातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजू पारवे यांनीही याच कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. 
 

Related Articles