माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते-पाटील करणार बंडखोरी   

धैर्यशील मोहिते-पाटील शरद पवारांची तुतारी घेऊन लढणार  
 
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक - निंबाळकर यांना दुसर्‍यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते-पाटील कुटुंबीयांमध्ये नाराजी पसरली आहे. रणजीतसिंह यांची उमेदवारी बदलण्याच्या मागणीसाठी रामराजे नाईक - निंबाळकर, तसेच विजयसिंह मोहिते -  पाटील यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये निर्णायक लढाई लढण्याचा निर्णय झाला. परंतु, भाजप पक्षश्रेष्ठींनी मोहिते - पाटलांना जुमानले नाही. विद्यमान खासदार निंबाळकर यांचीच उमेदवारी कायम ठेवली आहे .
 
दरम्यान, खासदार निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा माढा लोकसभेमधून इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते -  पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. कुटुंबातील सर्वच सदस्य मतदार संघातील गावागावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यात भाजपच्या नेत्यांना अपयश आले आहे. त्यातच महादेव जानकर यांनीसुद्धा ऐनवेळी शरद पवार यांची साथ सोडत महायुतीमध्ये प्रवेश केल्यामुळे माळशिरसमध्ये सक्षम विरोधक राहिलेलं नाही, अशी चर्चा आहे. परंतु मोहिते -  पाटलांनी आपण तोडीस तोड उमेदवार असल्याचे सांगत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदारसंघातील तिढा कायम असतानाच शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी अकलूजमध्ये मोहिते - पाटील यांच्या घरी भेट देऊन बंद खोलीत माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा केली. या बंद खोलीतील चर्चा सांगण्यास  नकार दिला असला तरी शरद पवारांची तुतारी घेऊन लढण्याचा अमोल कोल्हे यांनी निरोप दिला असल्याचे समजते. आमचं ठरलंय, यंदा माढा लोकसभा लढणार, हातात तुतारी घेणार, असे बाळदादा मोहिते - पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल्यामुळे, तसेच धैर्यशील मोहिते - पाटील हे या मतदारसंघातून उमेदवार असतील असे बाळदादांनी माध्यमांना सांगितल्यामुळे मोहिते - पाटलांनी आता बंडखोरीसाठी पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान मोहिते - पाटलांनी बंडखोरी करू नये म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीसुद्धा अकलूजमध्ये जाऊन मोहिते -  पाटील बंधूंशी चर्चा केली. मात्र ती चर्चा फोल ठरल्याचे सांगण्यात आले. आमचं ठरलंय, आता माघार नाही, धैर्यशील मोहिते - पाटील माढा लोकसभा लढणार आणि जिंकणार, केवळ माढा लोकसभाच नव्हे तर सोलापूर , सांगली, सातारा या जागा भाजप हरणार असल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस येथे सुद्धा भाजपचा पराभव होणार असल्याचे भाकीतही बाळदादा मोहिते - पाटील यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजपाने मात्र मोहिते -  पाटलांना आता बोलणे टाळले आहे. खासदार निंबाळकर मात्र प्रचाराच्या निमित्ताने मतदारसंघात फिरू लागले आहेत. 
 
आमदार गोरे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, माढाचे आमदार बबनदादा शिंदे तसेच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील यांनी मात्र खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा आणि त्यांना दीड लाख मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत पुतण्या धैर्यशील यांना खासदार करायचे, असा इरादा पक्का केलेल्या ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते - पाटील यांच्या हालचाली सुरूच आहेत.या पार्श्वभूमीवर विजयसिंह मोहिते - पाटील यांनी फलटण येथे रामराजे निंबाळकर यांच्या वाड्यावर जाऊन संजीवराजे निंबाळकर, तसेच समविचारी नेत्यांची बैठक घेऊन चर्चा केली आहे. भाजपाने उमेदवारीबाबत ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नीरा नृसिंहपूर येथे कुलदैवताचे दर्शन घेऊन मोहिते - पाटील यांच्या बालेकिल्ल्यात माळशिरस येथे नाईक - निंबाळकर यांच्या प्रचाराचा नारळ १२ एप्रिलला फोडणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच महायुतीतील पक्षाच्या पदाधिकार्‍यांनाही पाचारण करण्यात आले आहे.
 

Related Articles