रांझेमधील रंगाच्या कंपनीला आग   

जीवितहानी टळली; लाखोंचे नुकसान

 
भोर, (प्रतिनिधी) : पुणे सातारा महामार्गावरील रांझे गावच्या हद्दीतील एका रंगाच्या कंपनीला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. ही घटना बुधवारी सकाळी सव्वादहा वाजता घडली. आगीचे निश्चित कारण स्पष्ट झाले नाही. आगीत जीवितहानी टळली असली तरी यंत्रसामग्री, तयार व कच्च्या मालाचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनी व्यवस्थापनाने केला आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
 
‘टफ पॉलिमर्स प्रायव्हेट लिमीटेड’ असे आग लागलेल्या कंपनीचे नाव असून सत्तावीस कामगार तेथे काम करतात. आग लागताच घाबरलेले कामगार बाहेर पडले. स्थानिक व कामगारांनी ११२ क्रमांकावर घटनेची माहिती दिली. घटनेचे वृत्त कळताच राजगड ठाण्याचे पोलीस, तसेच भोर नगरपरिषद, कात्रज व नांदेड सिटी येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, कडक ऊन आणि रंगाचे बॅलर यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. सर्वत्र धुराचे लोट पसरले, तर जवळच्या ‘एस्कोपेंट प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीला सुध्दा आगीची झळ पोहोचली. तीन बंबाने आगीवर पाण्याचा मारा सुरू असल्यामुळे तीन तासाने आग आटोक्यात आली. 
 

Related Articles