नियोजनाअभावी बेल्ह्यात भीषण पाणीटंचाई   

बेल्हे, (प्रतिनिधी) : गेल्या चार दिवसांपासून नियोजनाच्या अभावामुळे बेल्हे नवीन गावठाणात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बेल्हे नगरीतील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे.
 
ऐन लग्नसराईतच मार्च महिन्यात बेल्हे नवीन गावठाणातील महिला ग्रामस्थांना पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. बेल्हे गावाला पाणीपुरवठा करणार्‍या प्रशासनाच्या अनियमितपणामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. बेल्हे येथील बाजार आवार, पिळणवस्ती, हौदबाग, कळस रस्ता, बौद्धवस्ती परिसरातील विहिरीसह हातपंपांवर महिलांसह पुरुषांची मोठी गर्दी दिसत आहे. तर रोज मोलमजुरी करणार्‍या महिलांना रात्री-अपरात्री कुपनलिकेवर पाण्यासाठी जावे लागत आहे.
 
पाण्याच्या या परिस्थितीमुळे आता पाणी भरावं की, रोज मजुरी करावी असा प्रश्न आता नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. नविन गावठाणात गेल्या चार दिवसांत नळपाणी योजनेच्या नळाला पाणी येऊ शकले नाही. गेल्या चार दिवसांपासून बेल्हे गावात नळाला पाणी येत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन करून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर महिला ग्रामस्थांच्यावतीने हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा स्वप्नील मुंजाळ यांनी दिला. सरपंच मनीषा डावखर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मौन धारण केले, तर उपसरपंच राजेंद्र पिंगट यांच्याकडे विचारणा केली असता ते माहिती घेतो मग पाहतो म्हणाले. ग्रामविकास अधिकारी दुराफे यांच्याशी संपर्क साधला ते उपलब्ध होऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांची भूमिका समजू शकली नाही.
 

Related Articles