महसुली तूट भरून काढण्यासाठी केंद्राची धडपड   

पुढील वर्षी बाजारातून उभे करणार ७.५ लाख कोटी 

 
नवी दिल्ली : पुढील आर्थिक वर्षात अर्थात २०२५ मध्ये पहिल्या सहा महिन्यांत केंद्र सरकार ७.५ लाख कोटी रुपये ठेवींच्या माध्यमातून उभे करण्याचा विचार करत आहे. एप्रिल ते सप्टेेंबर २०२४ -२०२५  या काळातील महसुली तूट भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे  केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले. पर्यायाने केंद्र सरकारसमोर महसुली तूट भरुन काढण्याचे मोठे आव्हान निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. 
 
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महसुली तूट भरून काढण्यासाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत त्यासाठी बाजारातून ठेवींच्या माध्यमातून रक्कम उभे करण्याची योजना सरकारची आहे. 
 
२०२४ -२५ मध्ये बाजारातून १४.१३ लाख कोटी उभे करण्यात येणार आहेत. त्यापैकी ५३ टक्के अर्थात ७.५ लाख कोटी उभे करण्याचे उद्दिष्ट पहिल्या सहा महिन्यांसाठी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या हंगामी अंदाजपत्रकात पुढील आर्थिक वर्षात १४.१३ लाख कोटी रुपये ठेवींच्या माध्यमातून बाजारातून उभे करण्यात येतील, असे सांगितले होते. त्या माध्यमातून महसुली तूट भरून काढली जाणार आहे. गेल्या वर्षी १५.४३ लाख कोटींची गरज होती. त्या तुलनेत रक्कम कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. २०२४-२०२५ साठी ग्रॉस आणि नेट बाजारातून अनुक्रमे १४.१३ लाख कोटी आणि ११.७५ लाख कोटी ठेवीतून उभे करण्यात येणार असल्याचा अंदाज होता. २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा विचार केला तर रक्कम कमी आहे. सध्या खासगी गुंतवणुकीतून सरकारकडे येणार्‍या पैशाचा ओघ कमी आहे. 
 
त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांकडून अधिक गुंतवणूक व्हावी, याकडे केंद्र सरकारचे लक्ष आहे. पोलाद, सिमेंट क्षेत्रात सरकार अधिक भांडवल गुंतवत आहे. त्यामुळे खासगी गुंतवणूकदारांचा या क्षेत्राकडे अधिक गुंतवणुकीसाठी ओघ वाढेल, असा अंदाज आहे. २०२३-२०२४ मध्ये १० लाख कोटींची गुंतवणूक सरकारला अपेक्षित होती. पुढील वर्षी गुंतवणूक ११.११ लाख कोटींपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. 
 

Related Articles