बीजेडीचे लोकसभेसाठी ९ उमेदवार जाहीर   

विधानसभेसाठी ७२ उमेदवारांची यादी

 
भुवनेश्वर : बीजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष नवीन पटनायक यांनी बुधवारी लोकसभेच्या ९ आणि विधानसभेच्या ७२ उमेदवारांची बुधवारी घोषणा केली. 
राज्यात लोकसभेच्या २१ आणि विधानसभेच्या १४७ जागा आहेत. त्यासाठी १३ मे, २०, २५ आणि १ जून या टप्प्यांत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
 
राज्यात बीजेडीने ‘एकला चलो’ची भूमिका घेतली असून लोकसभेच्या सर्व २१ जागांवर उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, लोकसभेच्या ९ उमेदवारांची पहिली यादी बीजेडीने जाहीर केली. यासोबतच, विधानसभा उमेदवारांचीदेखील घोषणा केली. यामध्ये स्वतः पटनायक यांच्या नावाचा समावेश आहे. ते जिल्ह्यातील हिंजली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. विधानसभेच्या ७२ उमेदवारांमध्ये १३ नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. तसेच, १२ महिलांना तिकीट दिले आहे.
 
विधानसभा अध्यक्षा प्रमिला मल्लिक यांसह बहुतेश मंत्र्यांनी बीजेडीने तिकीट दिले आहे. बीजेडीचे सरचिटणीस (संघटन) प्रणव प्रकाश दास संभलपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.
 
ओडिशाचे मंत्री सुदाम मरांडी हे मयूरभंज लोकसभा मतदारसंघातून निवडणूक आखाड्यात असतील. माजी भारतीय हॉकी कर्णधार दिलीप टिर्की यांचा सामना सुंदरगढ लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार जुआल ओरम यांच्याशी होणार आहे.लंबोदर नियाल (कालाहंडी), अंशुमन मोहंती (केंद्रपाडा), प्रजिप कुमार मांझी (नबरंगपूर) आणि मनमथ रौतरे (भुवनेश्वर), कौसल्या हिकाका (कोरापुट), रंजिता साहू (आस्का) यांनादेखील लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.विधानभेच्या १४७ पैकी ७२ उमेदवारांची घोषणा बीजेडीने केली आहे. 
 

Related Articles