छत्तीसगढमध्ये चकमकीत सहा नक्षलवादी ठार   

बिजापूर : छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत दोन महिला कार्यकर्त्यांसह सहा नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती एका पोलिस अधिकार्‍याने दिली.  
 
बासागुडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिपूरभट्टी गावाजवळील तालपेरू नदीकाठी असलेल्या जंगल परिसरात सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक उडाली, असे पोलिस महानिरीक्षक (बस्तर विभाग) सुंदरराज पी. यांनी सांगितले.या पथकात जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि कोब्राच्या जवानांचा समावेश होता.
 
पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या नक्षलवाद्यांबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा पथकाने मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी नक्षलवाद्यांनी अचानक पथकावर गोळीबार केला. त्यास पथकाने जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी जोरदार चकमक उडाली.या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळी दोन महिला नक्षलवादी आणि चार पुरूष नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. यासोबतच, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.
 
मृत नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाले असून त्यांचा शोध सुरू आहे, असेही सुंदरराज पी. यांनी सांगितले. बिजापूर जिल्हा बस्तर लोकसभा मतदारसंघात येतो. या ठिकाणी लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 
 

Related Articles