कर्नाटक काँग्रेसमधील गटबाजी उघड   

तिकीट वाटपावरून पाच आमदारांचा राजीनाम्याचा इशारा

बंगळुरू : लोकसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपावरून कर्नाटक काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री के.एच. मुनियप्पा यांचे जावई चिक्का पेद्दण्णा यांना कोलारमधून उमेदवारी दिल्यास आम्ही राजीनामा देऊ असा इशारा पक्षाच्या पाच आमदारांनी दिला आहे. कोलार लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. भाजपने आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही.
 
कोलार जिल्ह्यातील तीन आमदार कोथूर जी मंजुनाथ (कोलार), के.वाय. नांजेगौडा (मलूर) आणि एम.सी. सुधाकर (चिंतामणी) तसेच दोन विधान परिषद आमदार अनिल कुमार आणि नसीर अहमद (मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राजकीय सचिव) यांनी हा इशारा दिला आहे. सुधाकर हे सिद्धरामय्या मंत्रिमंडळात उच्च शिक्षण मंत्री आहेत.कोलार काँग्रेसमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के.एच. मुनियप्पा आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांचे दोन गट आहेत. त्यांच्यात नेहमीच संघर्ष पाहायला मिळतो.
 
कर्नाटक काँग्रसने १८ उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई आणि अन्य पाच मंत्र्यांचा समावेश आहे. राज्यात लोकसभेच्या २८  जागा आहेत. त्यासाठी दोन टप्प्यांत म्हणजे २८ एप्रिल आणि ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर, ४ जून रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे.
 

Related Articles