ईडीने जप्त केलेली संपत्ती गरिबांना वाटणार : मोदी   

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये इर्ंडीने जप्त केलेली संपत्ती गरिबांना वाटली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिले.पश्चिम बंगालमध्ये नोकरीच्या बदल्यात हजारो कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचे प्रकरण गाजले होते. या प्रकरणात गरिबांची मोठी लूट झाली होती. सुमारे तीन हजार कोटींचा गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणातील व्यक्तींंवर ईडीने कारवाई करून त्यांची संपत्ती जप्त केली होती. ही जप्त केलेली संपत्ती आता संबंधितांना परत केली जाईल, असे आश्वासन मोदी यांनी दिले. 
 
पश्चिम बंगालमधील किशनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अमृता रॉय यांच्याशी मोदी यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यावेळी मोदी यांनी वरील आश्वासन दिले. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात अमृता रॉय निवडणूक लढवत आहेत. 
 
मोदी म्हणाले, विरोधी पक्ष देशासाठी नव्हे तर सत्ता मिळविण्यासाठी धडपडत आहेत. राज्यातील गरिबांच्या झालेल्या लुटीचा प्रश्न रॉय यांनी मोदी यांच्यासमोर मांडला. तेव्हा मोदी म्हणाले, ज्यांनी गरिबांचा पैसा लुटून आपली घरे भरली, त्यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ती त्यांना परत करण्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करणार आहे. गरिबांचा लुटलेला पैसा त्यांना परत मिळावा, यासाठी सत्तेवर पुन्हा आल्यास कायदेशीर तरतूद केली जाईल.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार करणार्‍या काँग्रेसने आता आपली भूमिका बदलली असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी कोणाचेही नाव न घेता यावेळी केला. ईडीने केजरीवाल यांना अटक केल्यानंतर काँग्रेसने आता त्यांना पाठिंबा दिला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी भ्रष्टाचाराविरोधात लढत आहे. भारत भ्रष्टाचारमुक्त करण्याचे ध्येय भाजपचे आहे. त्यामुळे तरुणांचे भवितव्य उज्ज्वल होणार आहे. या उलट सर्व भ्रष्टाचारी एकमेकांना वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत, असे मोदी म्हणाले.
 

Related Articles