’आप’चे खासदार रिंकू भाजपमध्ये   

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे लोकसभेतील एकमेव खासदार सुशील कुमार रिंकू यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ‘आप’ आमदार शीतल अंगूरल यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आम आदमी पक्षास मोठा धक्का बसला आहे.रिंकू यांनी गेल्या वर्षी पंजाबमधील जालंधर लोकसभेची पोटनिवडणूक मोठ्या फरकाने जिंकली होती. ते लोकसभेतील ‘आप’चे एक एकमेव खासदार आहेत. तर शीतल अंगूरल हे जालंधर पूर्वचे आमदार आहेत. रिंकू यांना जालंधरमधून भाजपचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. 
 
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि पंजाबचे भाजप अध्यक्ष सुनील जाखड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला.
पंजाबच्या विशेषतः जालंधरच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे रिंकू म्हणाले. तसेच, ‘आप’ला मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नाहीत, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यशैलीने आपण प्रभावित असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवत आहेत. रिंकू हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जालंधर पश्चिम मतदारसंघात विजय  मिळविला होता. २०२३ च्या जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीत ते ‘आप’चे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आणि 
विजयी झाले.
 
शीतर अंगुरल यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत रिंकू यांचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर रिंकू आम आदमी पक्षात सहभागी झाले. 
लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. 
 
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात केजरीवाल यांना अटक झाली आहे. अशातच ‘आप’च्या एकमेव खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केला. पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा आहेत. ‘आप’ने ८ जागांवर उमेदवार रिंगणात उतविले आहेत. यामध्ये रिंकू यांच्या नावाचा समावेश होता.
 

Related Articles