मोईत्रा, हिरानंदानी यांना ईडीचे समन्स   

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा आणि दुबईस्थित व्यापारी दर्शन हिरानंदानी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत समन्स बजावले आहे. त्यानुसार, त्यांना आज (गुरूवारी) चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.ईडीने मोईत्रा यांना याआधी दोन वेळा समन्स बजावले. मात्र, विविध कारण पुढे करत त्या चौकशीस सामोर्‍या गेल्या नाहीत.आता ईडीने नव्याने समन्स बजावत आज येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
ईडीने याआधीदेखील हिरानंदानी यांना समन्स बजावले होते. त्यावेळी त्यांचे वडील निरंजन हिरानंदानी यांनी मुंबईत ईडीसमोर हजेरी लावली होती.मोईत्रा यांची अनैतिक वर्तनासाठी डिसेंबरमध्ये लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर, तृणमूल काँग्रेसने मोईत्रा यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.
 
अदानी समूहाला लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा यांनी उद्योजक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप भाजप खासदार निशीकांत दुबे यांनी केला होता. तसेच, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर, भाजपचे खासदार विनोद कुमार सोनकर यांच्या नेतृत्वाखाली नैतिकता समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अहवालानुसार मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईस मोईत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 
 
याच प्रकरणात मागच्या आठवड्यात केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) मोईत्रा यांच्या कोलकात्यातील निवासस्थानासह इतर ठिकाणी छापे घातले होते.लोकपालच्या निर्देशानुसार, सीबीआयने मोईत्रा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला असून याबाबत सीबीआयला सहा महिन्यांत आपला अहवाल सोपवावा लागणार आहे.
 

Related Articles