कोणाच्या सुनेला झारखंडचा कौल?   

चर्चेतले राज्य

 
हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडचे राजकारण एका वेगळ्या वळणार येऊन ठेपले. झारखंडमधील तालेवार घराणे असलेल्या सोरेन यांच्या राजकीय कुटुंबातील दोन सुना एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आहेत. हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना व दुर्गा सोरेन यांच्या पत्नी सीता यांच्यात काटें की टक्कर होणार आहे. यामुळे शीबू सोरेन यांच्या कुटुंबात नवे वादळ आले आहे. याचा फायदा कल्पना सोरेन यांना होणार की सीता सोरेन यांना, हे लवकरच उमगेल.
 
छत्तीसगडमध्ये ७३ उमेदवारांना निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. राजनंदगावची जागाही सध्या चर्चेत आहे, कारण या जागेवर माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि भाजपचे संतोष पांडेय यांच्यात कलगीतुरा रंगणार आहे. काँग्रेसचे भूपेश बघेल हे छत्तीसगडमधील सर्वाधिक चर्चेतील नेते आहेत. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात बस्तर लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता खेडोपाडी, चौकाचौकात निवडणुकीच्या मुद्द्यांचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत. छत्तीसगड-झारखंड सीमेवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव दल आणि सीएफच्या जवानांनी घनदाट जंगलात शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आणि विकासकामांना नक्षलवाद्यांचा विरोध नवीन नाही. येथे अलिकडेच झालेल्या एका चकमकीमध्ये ३६ लाख रुपयांचे पारितोषिक असलेल्या नक्षलवाद्याला यमसदनी धाडण्यात सुरक्षा दलांना यश आले. सीमावर्ती भागातील गावांमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. छत्तीसगड-झारखंड सीमेजवळील मनोरा, आस्ता, सन्ना आणि चैनपूर गावात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या आधी नक्षलवादी सातत्याने हिंसाचार करत आहेत. छत्तीसगडमध्ये भाजप सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल राज्याचे वनमंत्री केदार कश्यप यांनी जगदलपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते म्हणाले की छत्तीसगडमध्ये मोदी यांच्या हमीवर निवडणुका लढल्या गेल्या आणि या हमीभावात सरकारने शेतकरी, शेतकरी आणि गरिबांना घरांचा लाभ दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने चर्चिलेले मुद्दे आणि काँग्रेस सरकारने उपस्थित केलेले भ्रष्टाचाराचे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. या शिवाय माओवाद्यांचा मुद्दादेखील चर्चेत आहे. सरकार नक्षलग्रस्त भागात गावांचा विकास करत आहे, शस्त्रे ठेवून नक्षलवाद्यांशी वाटाघाटी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. काँग्रेसने बस्तर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव अद्याप निश्चित केले नसल्याबद्दल केदार कश्यप यांनी खरपूस समाचार घेतला. यावरून काँग्रेस निवडणुकीबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. बस्तर लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार हे काँग्रेसला बराच काळ ठरवता आले नाही.
 
छत्तीसगडच्या प्रदेश काँग्रेसध्ये नवा भूकंप झाला आहे. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे राजकीय सल्लागार विनोद वर्मा आणि कोषाध्यक्ष राम गोपाल अग्रवाल यांनी पक्षनिधीच्या ५.८९ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य आणि प्रदेश सरचिटणीस अरुण सिसोदिया यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात झारखंडमधील ‘इंडिया’ आघाडीचे जागावाटप जवळपास नक्की झाले आहे. झारखंडमध्ये काँग्रेसचे सात जागांवर एकमत झाले आहे. त्याच वेळी हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाने या वेळी पाच जागांवर निवडणूक लढवण्याचे मान्य केले आहे. ‘इंडिया’ आघाडीतील इतर दोन पक्ष, लालू यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि ‘सीपीआय’ला  प्रत्येकी एका जागा दिली गेली आहे. राष्ट्रीय जनता दलाला चत्राची तर ‘सीपीआय’ला कोडरमाची जागा देण्यात आली आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर दिल्लीमध्ये नुकतीच काँग्रेस निवडणूक समितीची बैठक झाली. या काळात सर्व पक्षांमध्ये जागावाटपाबाबत जोरदार चर्चा झाली आणि त्यानंतर झारखंडमध्ये जागा वाटपावर जवळपास एकमत झाले. झारखंडमध्ये लोकसभेच्या १४ जागा आहेत. 
 
झारखंड मुक्ती मोर्चा दुमका लोकसभा जागेबाबत लवकरच निर्णय घेईल. हेमंत सोरेन यांच्या भावजय सीता सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष शिबू सोरेन स्वतः दुमका मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी अटकळ बांधली जात आहे. झारखंडमध्ये चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. येथे सिंहभूम, खुंटी, लोहरदगा आणि पलामू या जागांवर १३ मे रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर २० मे रोजी चतरा, कोडरमा आणि हजारीबाग, २५ मे रोजी गिरिडोह, धनबाद, रांची आणि जमशेदपूर तर १ जून रोजी राजमहल, दुमका आणि गोड्डा या जागांवर मतदान होणार आहे. झारखंडमधील मागील निवडणुकीत भाजप-एजेएसयू युतीने १४ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसच्या खात्यात एकच जागा आली. माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या पत्नी गीता कोडा यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला होता; मात्र अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर कल्पना सोरेन मुख्यमंत्री बनण्याची शक्यता होती; मात्र चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. कल्पना सोरेन आपल्या पतीने केलेली कामे जनतेसामोर ठेवत ‘भारत जोडो न्याय यात्रेत’ सहभागी झाल्या, तर भाजपमध्ये गेलेल्या सीता सोरेन सांगतात की, १४ वर्षे योगदान देऊनदेखील झारखंड मुक्ती मोर्चात त्यांना योग्य तो मानसन्मान देण्यात आला नाही. सीता आणि कल्पना एका पक्षात होत्या; परंतु सीता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे सध्या झारखंडमध्ये एकाच कुटुंबातील दोन सदस्य आमने सामने उभे ठाकले आहेत. सोरेन कुटुंबातील दोन सुनांपैकी कोण जिंकणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
 

Related Articles