किस्से निवडणुकीचे   

अनोखे मतदान!

 
नवी दिल्लीतील एक उमेदवार ‘प्रभू येशू ख्रिस्त’ या नावाने उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी मागत होता. चेन्नईतील मतदार कोणत्याही उमेदवाराला नाही, तर निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना मतदान करण्यावर ठाम होता. ओडिशात फक्त अडीच फूट उंचीचा माणूस मतदानासाठी आला, तेव्हा त्याने एक छोटेसे टेबल सोबत आणले होते. काही ठिकाणी मतपेट्या उघडल्या असता, त्यात मतपत्रिकेशिवाय इतर अनेक गोष्टी आढळून आल्या. काही ठिकाणी उमेदवाराच्या नावावर शिवीगाळ असलेली कागदपत्रे बाहेर आली, तर काही ठिकाणी रुपयांच्या नोटा किंवा नाणीही बाहेर आली. कुणी आपल्या आवडत्या अभिनेत्याचं छायाचित्र मतपेटीत टाकलं होतं, तर कुणी कुणा नेत्याच्या नावानं पत्र लिहिलं होतं. मतदार सामान्यतः मताच्या सामर्थ्याला कमी लेखतात आणि अनेक वेळा मतदानाला जात नाहीत, असा आरोप होतो. मात्र इतिहासात असे अनेक प्रसंग निवडणुकीच्या रणधुमाळीत पाहायला मिळाले आहेत, जेव्हा मतदानासाठी जाऊन मत न देता मतदाराने वेगळ्या प्रकारे आपला निषेध मतपेटीतून व्यक्त केला आहे.
---

चुटकीसरशी तिढा सोडवतो...

 
काही लोक विक्षिप्तपणासाठी प्रसिद्ध असतात. त्यांचे दावे तर ‘मुंगेरीलाल के सपने’सारखे असतात. एका वेडाने ते पछाडलेले असतात. काहींना निवडणूक लढवण्याची भारी हौस असते. या बाबतीत काका धरतीपकड यांच्यानंतर आपल्याकडे अभिजीत बिचकुले यांचेच नाव घेतले जाते. महायुतीतील जागावाटपाचा तिढा अनेक दिवस कायम राहिला असताना बिचुकले यांना कोणता फॉर्म्युला सापडला माहीत नाही; परंतु महायुतीच्या नेत्यांनी जागावाटपासाठी आपल्याकडे यावे, आपण तिढा सोडवू, असे त्यांनी सांगून टाकले. 
 
सातारा लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले आहे. उदयनराजे यांना दुसर्‍या पक्षात जायची काय गरज? उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांना दिल्लीला जावे लागणे हे दुर्दैवी आहे, असे मत ते व्यक्त करतात. बिचकुले म्हणतात, अजित पवारांना लोकसभेसाठी केवळ दोन-तीन जागा मिळतात, हे योग्य नाही. महायुतीमध्ये सगळे सहकारी पक्ष अमित शाह यांचे चाकर झाले आहेत. उदयनराजे माझे बंधू होते, आहेत आणि राहणार. मी अनेक निवडणुका त्यांच्या विरोधात लढवल्या; पण आम्ही आजही चांगले मित्र आहोत. छत्रपती हे छत्रपती आहेत, ते इकडे-तिकडे फिरताहेत हे मला पटत नाही. या वक्तव्याखेरीज आपण राज्याला नवी दिशा देणार, हे त्यांचे वक्तव्य आणि आत्मविश्वास पाहिला की डोके चक्रावून जाते.
----

ग्वाल्हेरचे शिंदे घराणे असे आले राजकारणात...

 
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपल्या पारंपरिक गुणा लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उभे राहिले आहेत. गेल्या वेळी ते तिथून पराभूत झाले होते. गुणा या मतदारसंघाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ज्योतिरादित्य यांच्या आजी आणि ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याच्या महाराणी विजयाराजे शिंदे या त्या मतदारसंघातून दुसर्‍या प्रयत्नात निवडून आल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर महाराजा जिवाजीराव शिंदे यांनी ग्वाल्हेरचे संस्थान भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला. १९५१ ला देशात पहिली निवडणूक झाली; मात्र शिंदे घराण्याला राजकारणात स्वारस्य नव्हते. त्यांच्या प्रदेशातून हिंदू महासभा जिंकली आणि कॉँग्रेस पराभूत झाली. दुसर्‍या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि नेहरूंना त्यांच्या पराभवाची चिंता वाटू लागली. त्यांना शिंदे घराणे हिंदू महासभेला पाठिंबा देत असल्याचा संशय होता. १९५६ मध्ये देशात राज्य पुनर्रचनेचा कायदा झाल्याने पूर्वीच्या ग्वाल्हेर राज्याची मध्य भारत म्हणून असलेली ओळखही संपली होती. 
 
नवे मध्य प्रदेश राज्य अस्तित्वात आले होते. कॉँग्रेसची आपल्याबद्दलची शंका दूर करण्यासाठी विजयाराजे यांनी नेहरूंची भेट घेतली. या भेटीत नेहरूंनी विजयाराजे यांना पती जिवाजीरावांना निवडणूक लढवण्यास सांगावे, असे सुचवले; मात्र विजयाराजेंनी आपल्या पतींना राजकारणात रस नसल्याचे सांगितल्यानंतर नेहरूंनी शास्त्री आणि गोविंद पंत यांची भेट घेण्यास सांगितले. या भेटीमध्ये त्या दोघांनी स्वतः विजयाराजेंनीच निवडणूक लढवावी, अशी सूचना केल्यानंतर त्यांनी कॉँग्रेसतर्फे निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यांनी हिंदू महासभेच्या उमेदवाराचा एक लाख १८ हजार मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःचा फारसा प्रचारही केला नव्हता.
---

तुरुंगात साखरपुडा

 
माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म १५ जानेवारी १९२१ रोजी सातारा जिल्ह्यातील तारळे इथे झाला. त्यांचे वडील अनंतराव हे सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते. ते अभ्यासात हुशार होते. तरुण वयातच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. १९४० च्या दशकात त्यांनी भूमिगत राहून सातारा, कोल्हापूर, सांगली या भागात काम केले. ब्रिटिशांची नजर त्यांच्या कारवायांवर पडली आणि त्यांची सर्व खासगी मालमत्ता जप्त करण्यात आली. १९४२ मध्ये गांधींजींनी ‘भारत छोडो’चा नारा दिला. त्याच वेळी इंग्रजांनी काँग्रेसच्या नेत्यांची धरपकड सुरू केली. बाबासाहेब भोसलेंना दीड वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला; मात्र तुरुंगाचा आणि त्यांचा संबंध इथे संपला नाही. बाबासाहेब भोसलेंचा साखरपुडा तुरुंगातच झाला. 
 
स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांची कन्या कलावती यांच्याशी त्यांचा विवाह निश्चित झाला. तुळशीदास जाधव हे येरवडा तुरुंगात होते. आपल्या डोळ्यासमोर हा साखरपुडा व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार बाबासाहेब आणि कलावती यांचा साखरपुडा येरवडा येथे तुरुंगाधिकार्‍यांच्या निगराणीत पार पडला. त्या काळी या गोष्टीची चर्चा बरीच झाली होती. १९४५ मध्ये त्यांचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने झाला. १९४७ मध्ये त्यांनी ‘काँग्रेसचा इतिहास’ हे पुस्तक लिहून आपल्या अभ्यासू वृत्तीची चुणूक दाखवली होती.
---

बॅलेट पेपर नव्हे, बॅलेट बुक!

तामिळनाडूमध्ये झाला होता प्रयोग

 
ईव्हीएम मशीनला अनेकांचा विरोध आहे. आता मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाला आहे. शंभरजणांनी अर्ज भरले, तर निवडणूक आयोगाला मतचिठ्ठीवर मतदान घ्यावे लागेल, असे त्यामागचे गणित आहे. मतचिठ्ठीवर मतदान झाल्यास लोकांच्या मनातील शंकाही दूर होतील. असेच तामिळनाडूमध्ये झाले होते. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत एका जागेसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाला मतदानाची तारीख लांबणीवर टाकावी लागली होती. त्यामुळे ती आजवरच्या निवडणूक इतिहासात सर्वाधिक चर्चिली गेलेली निवडणूक ठरली होती. सर्वाधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेव्हा निवडणुका ‘ईव्हीएम’ऐवजी बॅलेट पेपरवर लढवल्या जात होत्या. निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांची संख्या खूप होती. त्यावेळी निवडणूक आयोगाला मतपत्रिकेऐवजी ‘बॅलेट बुक’ छापावे लागले होते. १९९६ मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहात होते. तेव्हा मोदाकुरिची मतदारसंघातली निवडणूक चांगलीच गाजली. या मतदारसंघातली उमेदवारांची सर्वाधिक संख्या देशात चर्चेचे कारण ठरले. येथे एका जागेसाठी एक हजारांहून अधिक उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केले होते. मोदाकुरिचीमध्ये १०३३ उमेदवार रिंगणात होते. मोठ्या संख्येने नामांकन आल्यावर निवडणूक आयोग बुचकळ्यात पडला होता. लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा हक्क असल्याने आयोगाने हात टेकले. उमेदवारांना मोठ्या संख्येने मत देण्याची व्यवस्था कशी करावी, हा प्रश्न आयोगासमोर होता. मात्र निवडणूक आयोगाने हार मानली नाही. एका बॅलेट पेपरवर १०३३ उमेदवारांची नावे छापली. एरवी एक-दोन पानांचा असलेला बॅलेट पेपर चक्क बॅलेट बुक ठरला होता. नाव शोधून उमेदवारांना मतदान करावे लागले होते. उमेदवारांची नावे इतकी जास्त म्हटल्यावर शोधण्यासाठी वेळ लागणारच. म्हणून निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ वाढवली, मतदान पेटीचा आकारही वाढवला.
 

Related Articles