‘कसबा पॅटर्न’ची पुन्हा चर्चा   

भागा वरखडे

 
पुणे मतदारसंघ गेल्या काही वर्षांमध्ये भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचा प्रयत्न अनेकदा झाला; परंतु पुणे महापालिका दोन्ही काँग्रेसच्या ताब्यात असतानाही हा प्रयोग यशस्वी झाला नाही. भाजपने माजी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना, तर काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजप बालेकिल्ला राखणार, की कसबा पॅटर्नची पुनरावृत्ती होणार का, हे आता पाहायचे.
 
लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रात ही निवडणूक तब्बल पाच टप्प्यांमध्ये होईल. यापैकी चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आपल्या मताधिकाराचा वापर करता येईल. पुणे लोकसभा मतदारसंघ २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडे होता. खरे तर भाजपच्या स्थापनेनंतर रामभाऊ म्हाळगी यांनी येथे जनसंघाचे मोठे काम केले. त्यानंतर ते ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. पुणे शहरात पूर्वी शिवसेनेचे आमदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसही मजबूत होती. आता भाजपने शहरावर वर्चस्व निर्माण केले आहे. 
 
गेल्या दोन निवडणुकींमधील यशानंतर आताच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला येथे हॅटट्रिक साधण्याची संधी आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयामुळे काँग्रेसलाही हा मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेण्याची स्वप्ने पडत आहेत. पुणे लोकसभेसाठी भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या (चार भाजप, एक अजित पवार गट) ताब्यात असल्यामुळे भाजपसाठी ही लढाई फारशी अवघड नसल्याचे मानले जात आहे; पण कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिल्यामुळे देशातील या सर्वात जुन्या पक्षालाही या ठिकाणी विजयाची स्वप्ने पडत आहेत.
 
पुणे लोकसभा मतदारसंघातील कसबा पेठ हा अवघा एक विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. येथील माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत धंगेकर हे निवडून आले आहेत. त्याच आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. श्री. धंगेकर सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या राजकारणासाठी ओळखले जातात. कसबासह लगतच्या विधानसभा मतदारसंघावरही त्यांचा चांगला प्रभाव आहे. त्यातच या निवडणुकीत काँग्रेसच्या स्थानिक जुन्याजाणत्या नेत्यांनी पक्षासाठी अंग झटकून घाम गाळण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे काँग्रेस येथे भाजपला चांगली लढत देईल, असा दावा केला जात आहे. असे असले, तरी उमेदवारी न मिळालेले मोहन जोशी आणि धंगेकर यांच्या उमेदवारीविरोधात नाराज असणारे माजी उपमहापौर आबा बागुल काय करतात, हे गुलदस्त्यात आहे.  
 
भाजपने मोहोळ यांना मैदानात उमेदवारी जाहीर केल्यानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकांचे सत्र सुरू केले आहे; पण संथ गतीने होणारा मेट्रोचा विस्तार, पुरंदरच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा, शहरातील अपुर्‍या पायाभूत सोईसुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी मुद्दे भाजपसाठी अवघड ठरतील असे मानले जात आहे. मराठा आणि ओबीसी मतदारांची भूमिकाही या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः मोहोळ यांना उमेदवारी मिळाल्यामुळे पक्षातील इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपला करावा लागणार आहे. पुण्याचे जगदीश मुळीक हे उमेदवारीच्या स्पर्धेत होते. मोहोळ यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांची नाराजी खर्‍या अर्थाने दूर झाली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपला यश मिळेल, असा दावा केला जात आहे.
 
शिवसेनेतून आपला राजकीय प्रवास सुरू करणार्‍या रवींद्र धंगेकर यांचा विविध राजकीय पक्षांशी संबंध राहिला. दहा वर्षे शिवसैनिक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मनसेच्या तिकिटावर त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले. ते चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. मनसेमध्ये असताना विविध पदांवर काम केले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला; पण स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते काँग्रेसमध्येच आहेत. धंगेकर यांनी ओबीसी समुदायात विकासाचा चेहरा म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. २००९ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली; पण त्यात त्यांचा अवघ्या सात हजार मतांनी पराभव झाला. 
२०१४ च्या मोदी मोदी लाटेत त्यांनी भाजपला कडवी टक्कर दिली. त्यानंतर २०१९ मध्ये काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली. 
 
यामुळे ते मैदानाबाहेर राहिले; पण कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपला अस्मान दाखवले आणि विधानसभेत थाटात प्रवेश केला. मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची फौज पाहून काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास धंगेकर किती सार्थ ठरवतात हे निकालातून समजू शकेल.
 
मोहोळ हे पुणे महापालिकेचे धडाडीचे कार्यकर्ते आणि माजी महापौर. सर्वसामान्य कार्यकर्ता, पुण्याचे महापौर ते आता लोकसभेचे उमेदवार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात भाजपची प्रचंड ताकद आहे. ही ताकद वाढवण्यासाठी मोहोळ यांनी भरपूर प्रयत्न केले. शिवाय ते फडणवीस यांचे निकटवर्तीयही मानले जातात. मोहोळ यांनी २००२, २००७, २०१२ व २०१७ मध्ये पुणे महापालिकेचे सदस्य म्हणून विजय मिळवला. २०१९ ते २०२२ दरम्यान त्यांनी महापौर म्हणून काम केले. पुणे मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे संचालक म्हणूनही काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. कोरोनाकाळात त्यांनी पुण्यात उल्लेखनीय काम केले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने गिरीश बापट यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तीन लाख २४ हजार ६२८ मतांनी पराभव केला. बापट यांना ६१.१ टक्के तर जोशी यांना २९.७६ टक्के अर्थात तीन लाख आठ हजार २०७ मते मिळाली होती; पण या वेळी चित्र बदलले आहे. खासदार बापट यांचे गेल्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. आता या ठिकाणी थेट निवडणूक होणार आहे.
 

Related Articles